पद्मश्री विखे जयंती आता शेतकरीदिन

राज्य सरकारचा निर्णय; निधीची तरतूद मात्र नाही

भागा वरखडे

नगर – सहकारी साखर कारखानदारीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांची जयंती शेतकरीदिन म्हणून साजरा करण्याचा आदेश राज्य सरकारने काढला असला, तरी त्यासाठी तरतूद मात्र काहीच केलेली नाही. शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी हा दिन साजरा करताना सरकारने तिजोरीला मात्र कोणतीही तोशीस लागणार नाही, याची दखल घेतली आहे!
पद्मश्री विठ्ठलराव विखे यांच्या काळात नगर जिल्ह्यात खासगी साखर कारखानदारी होती. खासगी साखर कारखानदारीकडून शेतकऱ्यांची लूट होत होती. शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर गाळला जात नव्हता. पैसैही मिळत नव्हते. त्यातून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी त्यांनी सहकारी साखर कारखानदारीचे रोपटे लावले. त्यामुळे खासगी कारखानदारांची मक्तेदारी संपली. शेतकऱ्यांना न्याय मिळायला लागला. शेतकऱ्यांच्या मुलांना उच्चशिक्षण मिळावे, या साठी त्यांनी शिक्षण संस्था सुरू केल्या. पहिलीपासून ते वैद्यकीय महाविद्यालयापर्यंतच्या शिक्षणाची सुविधा ग्रामीण भागात आणली. त्यांची जयंती दरवर्षी नारळी पौर्णिमेला साजरी केली जाते. साहित्यांतील नामवंतांना पुरस्कार देऊन गौरविले जाते. राज्य सरकारनेही शेतकऱ्यांचा सन्मान वाढविणाऱ्या या नेत्याच्या जयंतीदिनी शेतकऱ्यांचा सन्मान करण्याची बाब सरकारच्या विचाराधीन होती.
पद्मश्री विखे यांची जयंती दरवर्षी नारळी पौर्णिमेला साजरी केली जाते. त्यानुसार राज्य सरकारने दरवर्षी पद्मश्री विखे यांची जयंती शेतकरीदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या चार वर्षांपूर्वीच शेतकरीदिन साजरा करण्यात येतो; परंतु त्यासाठी कोणतीही तरतूद नसल्याने केवळ औपचारिकता म्हणून हा दिन साजरा केला जातो. सरकारने विखे पाटील जयंतीदिनी छोटे कार्यक्रम घेण्याचा आदेश कृषी विभागाला दिला आहे. तत्कालीन कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामुळे सरकारने हा उपक्रम सुरू केला असला, तरी त्यासाठी पुरेशी तरतूद करायला हवी; परंतु कार्यक्रम करा, मेळावे घ्या, मार्गदर्शन करा आणि त्यासाठी तरतूदही तुमच्याच खर्चातून करा, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. उन्नत शेतकरी, समृद्ध शेतकरी कार्यक्रमांतर्गत शेतकरी मेळावे घेऊन शेतकऱ्यांना उन्नत व समृद्ध शेती कशी करता येईल, हे दाखवून द्यावे, अशा सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. ग्रामसभा व अन्य माध्यमातून शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन व साह्य करण्याच्या सूचना आहेत. कृषी सयंत्र व औजारांचे वितरण करावे, असेही या आदेशात म्हटले आहे. पीक संरक्षणाच्या प्रभावी उपाययोजना करण्याचे मार्गदर्शन करण्यासही राज्य सरकारने सांगितले आहे.
शेतकऱ्यांच्या सन्मानाचा दिन; परंतु त्यासाठी अतिरिक्त तरतूद मागू नका, असे राज्य सरकारनेच बजावले आहे. शिवाय कार्यक्रमही छोटे घ्या. कृषी आयुक्तांच्या अधिनस्थ खर्च करा, असे या आदेशात म्हटले आहे. शेतकऱ्यांचा हा कोरडा सन्मान करण्याची राज्य सरकारची वृत्ती अनेक शेतकऱ्यांना खटकली आहे. वास्तविक शेतकऱ्यांचा सन्मानदिन साजरा करायचा होता, तर सहकार, कृषी व अन्य क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्यांना पुरस्कार देऊन या दिवशी गौरविता आले असते; परंतु त्याकडे राज्य सरकारने लक्ष दिलेले नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)