पदाची सूत्रे घेताच डागली तोफ

पिंपरी – राष्ट्रवादीच्या काळात पिंपरी-चिंचवड महापालिकेची सुरळीत चाललेली घडी भाजपच्या काळात मोडकळीस आली आहे. सत्ताधाऱ्यांना कचऱ्याचा ठेकादार देखील भ्रष्टाचारासाठी कमी पडू लागला आहे. वर्षभरात भाजप पदाधिकाऱ्यांनी स्वत:ची घरे भरली त्यामुळे महापालिका व सभागृहात सत्ताधारी भाजपचा भ्रष्टाचार पुराव्यानिशी जनतेसमोर मांडणार असल्याचा इशारा राष्ट्रवादीचे नगरसेवक व नवनियुक्त विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी दिला.

महापौर नितीन काळजे यांनी त्यांना गुरुवारी (दि.17) विरोधी पक्षनेते पदाचे नियुक्ती पत्र दिले. त्यानंतर विरोधी पक्ष नेते दालनात पत्रकारांशी ते बोलत होते. दत्ता साने यांनी सत्ताधारी भाजपच्या कारभारावर सडकून टीका केली. ते म्हणाले की, शहर चोहोबाजुंनी विस्तारत असताना विकासाच्या कक्षादेखील रुंदावल्या पाहिजेत. हे करण्याऐवजी सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी मात्र आता कचऱ्याच्या ठेक्‍यात गुंतलेले आहे.

राष्ट्रवादीच्या काळात शहरातील कचऱ्याच्या ठेक्‍याचे विकेंद्रीकरण केल्याने ही समस्या भेडसावत नव्हती. मात्र. काही ठराविक ठेकेदार डोळ्यासमोर ठेवल्यानेच शहरातील कचऱ्याची समस्या उग्र झाली आहे. राष्ट्रवादीच्या काळात केंद्राचा “बेस्ट सिटी’ अवॉर्ड पटकविणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेला भाजपने वर्षभरातच कचऱ्याचे शहर अशी नवी ओळख निर्माण करुन दिली आहे. याशिवाय नागरिकांच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या कंत्राटी कामगारांना चार-चार महिने वेतन दिले जात नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. केवळ कचराच नव्हे, तर शहरातील नागरिकांच्या हितास बाधा निर्माण करणाऱ्या कारभाराला राष्ट्रवादीचा कायम विरोध असणार आहे. मात्र. चांगल्या कामाला विरोध करणार नाही, असेही साने यांनी यावेळी स्पष्ट केले.

गेली वर्षभरात राष्ट्रवादीच्या विरोधी पक्षनेते कार्यालयात आली मरगळ दुर करण्यासाठी दररोज दोन तास कार्यालयात उपस्थित राहणार असून, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी या कार्यालयात पक्षाच्या नगरसेवकांनदेखील नियमितपणे उपस्थित राहतीाल, याकडे लक्ष देणार आहे. तसेच, नवनियुक्तीमुळे पदाधिकाऱ्यांमध्येदेखील उत्साह संचारला असून, भाजपच्या विरोधात पदाधिकारी व कर्याकर्त्यांना सक्रीय करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

यावेळी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, राजु मिसाळ, शाम लांडे, मोरेश्‍वर भोंडवे, नगरसेविका विनया तापकीर, सुलक्षणा शीलवंत-धर, वैशाली काळभोर, प्रज्ञा खानोलकर, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, प्रवक्ते फजल शेख, आनंदा यादव व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्राधिकरणाच्या पैशांवर भाजपचा डोळा
भूमिपुत्रांच्या जमिनी संपादित करुन, प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. या भागातील रहिवाशांना महापालिका सर्व नागरी सुविधा पुरवित असताना, प्राधिकरणाचे महापालिकेत विलीनीकरण संयुक्तिक ठरणार आहे. मात्र, प्राधिकरणाची मालमत्ता व पैसा यावर भाजपचा डोळा असून, साडे बारा टक्के लाभापासून वंचित असलेल्या आम्हा सर्व भूमिपुत्रांचा प्राधिकरणाच्या पीएमआरडीएतील विलीनीकरणाला विरोध असल्याचे नवर्निवाचित विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)