पथारी पुनर्वसनाचा मार्ग मोकळा

अतिक्रमण विभागाकडून 288 जागा निश्‍चित
नो हॉकर्स झोन घोषीत रस्त्यांवरील व्यावसायिकांचे होणार पुनर्वसन

पुणे – गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शहर फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा होणार असून या धोरणानुसार शहरातील सुमारे 21 हजार पथारी व्यावसायिकांची नोंदणी करण्यात आली आहे. यातील तब्बल 19 हजार पथारी व्यावसायिकांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासनाने शहरातील मध्यवर्ती भागासह उपनगरांमधील तब्बल 288 जागा नियोजित केल्या आहेत. यातील बहुतांश जागांना वाहतूक पोलिसांनीही मान्यता दिलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने महापालिकेने नो हॉकर्स झोन म्हणून घोषीत केलेले 45 रस्ते आणि 153 चौकांमधील पथारी व्यावसायिकांचा समावेश असेल अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. हे धोरण मार्गी लागल्यास शहरातील पथारी व्यावसायिकांना उपजिविकेचे हक्काचे साधन मिळण्याबरोबरच शहरातील वाहतूक कोंडी आणि पदपथांवर होणाऱ्या अतिक्रमणांची समस्या सुटण्यास मदत होणार आहे.

शहरात आता 288 हॉकर्स झोन

महापालिकेने या धोरणाअंतर्गत शहरात केलेल्या प्राथमिक सर्व्हेक्षणात तब्बल 27 हजार पथारी व्यावसायिकांची नोंद झाली होती. त्यानंतर या पथारी व्यवसायिकांची महापालिकेने बायोमेट्रिक नोंद केली असता केवळ 21 हजार पथारी व्यासायिकांचीच नोंद झाली आहे. या व्यावसायिकांच्या पुनर्वसनाच्या जागा निश्‍चित करण्यासाठी मुख्यसभेने दिड वर्षापूर्वी हे अधिकार महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून त्यांच्या मार्फत घेण्याचे निश्‍चित केले होते. त्यानुसार, या जागा नियोजित केल्या असून त्यातील बहुतांश जागांना पोलिसांनी होकार दिला आहे. त्यानुसार, या 288 जागांवर सुमारे 19 हजार व्यावसायिकांचे पुनर्वसन केले जाणार आहे. तसेच या जागा या पुढे ” हॉकर्स झोन’ म्हणून ओळखल्या जाणार आहेत.

2 हजार पथारी आहे त्याच ठिकाणी

शहरातील सुमारे 18 जागांवरील तब्बल 2 हजार पथारी आहे त्याच ठिकाणी राहणार आहेत. त्यात डेक्कन लेन येथील हॉंगकॉंग लेन, सारसबाग अशा ठिकाणांचा समावेश आहे.हे व्यावासायिक नो
हॉकर्स झोन मधील घोषीत केलेल्या रस्त्यांवर तसेच चौकांमधे येत नसल्याने त्यांना त्याच जागेवर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच प्रशासनाने निश्‍चित केलेल्या जागांमध्ये इतर सर्व व्यावसायिकांचे पुनर्वसन करणे शक्‍य असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

कर्मचाऱ्यांअभावी पुनर्वसन रखडण्याची भिती

महापालिकेकडून पुढील वर्षभरात एवढया मोठया प्रमाणात पथारी व्यावसायिकांच्या पुनर्वसनाचे काम हाती घेण्यात असले तरी हे काम रखडण्याचीही दाट शक्‍यता निर्माण झाली आहे. अतिक्रमण विभागासाठी शहरात सुमारे 180 अतिक्रमण निरीक्षकांची गरज आहे. ही पदे महापालिकेच्या सुधारीत सेवा नियमावली मध्ये राज्यशासनाने मंजूरही केलेली आहेत.मात्र, असे असतानाच; या विभागात केवळ 16 अतिक्रमण निरिक्षक कार्यरत असून त्यांच्यावर संपूर्ण शहराची जबाबदारी आहे. परिणामी शहरातील अतिक्रमण कारवाईचा वेग मंदावलेला असून त्याचा परिणाम शहराच्या वाहतूकीवर होत आहे. तसेच आता एवढया मोठया प्रमाणात पुनर्वसन होणार असल्याने आणखी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा आवश्‍यकता प्रशासनास भासणार आहे.अन्यथा हे पुर्नवसनाचे काम रखडण्याची शक्‍यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)