पथारीच्याआड मटका अड्डा !

स्वारगेट येथील धक्कादायक प्रकार


अधिकारीही चक्रावले


पोलिस स्थानकापासून 100 मीटर अंतरावरील प्रकार


 

पुणे  : स्वारगेट येथे महापालिकेने पथारी व्यावसायिकाचा परवाना दिलेल्या एका टपरीच्या मागील बाजूस चक्क मटक्‍याचा अड्डा चालविला जात असल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी सकाळी समोर आला, महापालिकेच्या अतिक्रमण विभाग तसेच वाहतूक विभागाने पथारीला लावलेल्या पडद्याच्या संशय आल्याने आत मध्ये जाऊन पाहणी केली असता; ही बाब समोर आली, त्यानंतर महापालिका अधिकारी पालिकेच्या सुरक्षा रक्षकांना पाहताच; या ठिकाणी असलेल्या दहा ते पंधरा जणांनी जमा झालेली रक्कम घेऊन पोबारा केला. मात्र, हा मटक्‍याचा अड्डा स्वारगेट पोलीस स्थानकापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर दिवसा ढवळया सुरू असल्याने पोलीसांना माहित नव्हता का असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. दरम्यान, या पथारीचा परवाना कोणत्या व्यक्तीच्या नावावर आहे याची तपासणी अतिक्रमण विभागाने सुरू केली असून संबधित परवानाधारकांचा परवाना रद्द केला जाणार असल्याचे अतिक्रमण विभाग प्रमुख माधव जगताप यांनी स्पष्ट केले.

असा उघडकीस आला प्रकार
महामेट्रोच्या स्वारगेट येथील ट्रान्सपोर्ट हबचे काम सुरू झाले आहे. या हबच्या कामासाठी पाणी पुरवठा विभागाच्या जागेच्या मागील बाजूस असलेले राजश्री शाहू महाराज बसस्थानक, तसेच या परिसरातील पथारींचे पुनर्वसन इतरत्र केले जाणार आहे. त्यामुळे यासाठी संयुक्त पहाणी करण्यासाठी मेट्रोच्या अधिकाऱ्यांसह महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप, वाहतूक नियोजन विभागाचे प्रमुख श्रीनीवास बोनाला यांच्यासह पालिकेचे काही सुरक्षा रक्षक गेले होते. यावेळी पाहणी करताना, या बस स्थानकाच्या शेजारी असलेल्या स्वच्छतागृहा जवळ एका पथारीला बाहेरून पडदा लावण्यात आलेला होता. ही बाब खटकल्याने जगताप यांनी आपल्या सुरक्षा रक्षकासह, हा पडदा बाजूला केला, तर आत मध्ये काहीच व्यावसाय नव्हता, तर टपरीच्या मागील बाजूला एक दरवाजा तयार करण्यात आला होता, हा दरवाजा उघडून जगताप कर्मचाऱ्यांसह आत गेले असता; त्यांना धक्काच बसला, या ठिकाणी दहा ते पंधरा जण चक्क मटक्‍याचा अड्डा चालवित होते. टपरीच्या मागील बाजूस असलेल्या पालिकेच्या रिकामाच्या जागेत सुमारे 200 चौरस फूटाचे शेड बांधून आत मध्ये हा अड्डा सुरू होता. जगताप यांच्यासह खाकी गणवेशातील पालिकेचे सुरक्षा रक्षक पोलीस असल्याचा समज झाल्याने हे सर्व जण वाट मिळेल तिकडे पळाले, त्यातील काहींनी हाता नोटांचे बंडल तसेच बॅग घेऊन शेडच्या मागील बाजूने पळ काढल्याचे जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पोलीस यंत्रणा अनभिज्ञ कशी ?
ही पथारी ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणापासून स्वारगेट पोलीस स्टेशन अवघ्या 100 ते 150 मीटर अंतरावर आहे. विशेष बाब म्हणजे या चौकात दिवसभर वाहतूक पोलिसांसह, पोलिसांचा वावर असतो. तर पोलिसांच्या गस्ती पथकाकडून स्वारगेट स्थानक आणि या परिसराची नियमित तपासणी केली जाते, असे असतानाही, या मटका अड्डयांची माहिती पोलिसांना नव्हती का असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. तसेच माहिती असेल तर ही बाब महापालिकेच्या तपासणीत येण्या ऐवजी पोलीसांनीच त्यावर कारवाई का केली नाही असा प्रश्‍नही उपस्थित केला जात आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)