पथदिव्यांना गैरव्यवहाराचे “अर्थिंग’

काम नसताना लाखोंचा निधी ठेकेदारांच्या घशात

पुणे – शहरातील पथदिव्यांना आर्थिंग नसल्याचे कारण देत, क्षेत्रीय कार्यालयांकडून लाखो रुपयांचा निधी कोणतेही काम न करता ठेकेदारांच्या खिशात घातले जात असल्याचे चित्र आहे. पथदिवे बसविणाऱ्या ठेकेदारानेच त्यांना “अर्थिंग’ वायर जोडणे आवश्‍यक असताना, त्या बसविल्या नसल्याचे दाखवत क्षेत्रीय कार्यालयांकडून “अर्थिंग’च्या कामाच्या प्रत्येकी 10 निविदा तुकड्या-तुकड्याने काढल्या जात आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहरात महापालिकेचे सुमारे 1 लाख 32 हजार पथदिवे आहेत. त्यातील अनेक पथदिवे जुने झाल्यास काढले जातात. तर नवीन पथदिव्यांसाठी नगरसेवकांनी अंदाजपत्रकात “स’ यादीमध्ये निधी दिल्यानंतर खरेदी केले जातात. हे पथदिवे खरेदी केल्यानंतर ज्या ठेकेदाराकडून ते खरेदी करण्यात आलेले आहेत, त्यांच्याकडूनच ते बसवून घेतले जातात. त्यामुळे त्यांनी पथदिवे बसवून तसेच त्यासाठी आवश्‍यक असलेले सर्व खबरदारीचे उपाय आर्थिंग जोडूनच महापालिकेस देणे बंधनकारक आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत शहरात सुमारे 12 हजार पथदिवे ठेकेदारांनी “अर्थिंग’ वायर न जोडताच उभारून दिल्याचे पालिकेच्या तपासणीत समोर आले. त्यानंतर पालिकेने ज्या ठेकेदारांनी हे काम केले त्यांच्याकडून प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून या “अर्थिंग’ जोडून घेण्यास सुरूवात केली. जवळपास 10 हजार पथदिव्यांना “अर्थिंग’ वायरही जोडण्यात आली. असे असतानाच, देखभाल दुरूस्तीच्या नावाखाली अनेक क्षेत्रीय कार्यालयांनी पथदिव्यांना “अर्थिंग’ देण्याच्या निविदा काढल्या आहेत. या काढताना त्यात “अर्थिंग’ वायर जोडणे तसेच खांबांना रंग देणे अशा निविदा काढल्या आहेत. त्यामुळे एका बाजूला “अर्थिंग’ वायर असलेल्या खांबाना रंग देऊन या दोन्ही कामांचे पैसे लाटले जाण्याची शक्‍यता आहे. विशेष म्हणजे, ही कामे देखभाल दुरूस्तीची असल्याचे सांगत, विद्युत विभागही त्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे “अर्थिंग’च्या नावाखाली काम न करताही ठेकेदारांचे खिसे भरण्याचे काम कनिष्ठ अभियंत्यांकडून सुरू आहे.

बिले दिलीच कशी?
जो ठेकेदार पथदिवे बसवितो, त्याने “अर्थिंग’ यंत्रणा उभारून देणे बंधनकारक आहे. पण, पालिकेने शहरात केलेल्या तपासणीत 12 ते 15 हजार पथदिवे “अर्थिंग’ नसलेले आढळून आले आहे. प्रत्यक्षात ठेकेदाराने काम पूर्ण झाल्याचे पालिकेस कळविल्यानंतर क्षेत्रीय कार्यालयांकडून “थर्ट पार्टी’ सल्लागार आणि संबंधित खात्याच्या अभियंत्यांकडून संबधित काम तपासून पाहिले जाते. त्यानंतर काम योग्य, की अयोग्य याची शिफारस केली जाते. त्यानंतरच ठेकेदारांची बिले दिली जातात. मात्र, जर “अर्थिंग’विनाच पथदिवे हस्तांतरित करण्यात आले, तर पालिकेच्या अभियंत्यांनी काम पूर्ण झाल्याचे पत्र कोणत्या आधारावर दिले? तसेच “थर्ट पार्टी ऑडिट’ करणाऱ्यांनी काय “ऑडिट’ केले, असा प्रश्‍नही या प्रकारामुळे समोर येत आहे.

वास्तविक पाहता ज्या ठेकेदारांनीच “अर्थिंग’ करून देणे आवश्‍यक आहे. ज्यांनी दिले नाही, त्यांना बिले देऊ नयेत असे स्पष्ट आदेश आहेत. त्यामुळे ज्या-ज्या क्षेत्रीय कार्यालयांनी अशा निविदा काढल्या आहेत, त्याची माहिती घेतली जाईल. त्यानंतरच हे काम करून घेतले जाईल व बिले दिली जातील.
– श्रीनिवास कंदूल, मुख्य अभियंता, विद्युत विभाग.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)