पथदिव्यांठी गट विकास अधिकाऱ्यांकडून मिळणार “ना-हरकत’ प्रमाणपत्र

सुरज मांढरे यांचा निर्णय : प्रमाणपत्रासाठीची पायपीट होणार कमी

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि.12 – ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये पथदिवे बसविण्यासाठी लागणाऱ्या “ना-हरकत’ प्रमाणपत्रासाठी ग्रामपंचायतीला यापुढे जिल्हा परिषदेत येण्याची आवश्‍यकता नाही. आता गट विकास अधिकाऱ्यांकडूनच हे प्रमाणपत्र मिळणार आहे. त्याबाबतचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुरज मांढरे यांनी दिले आहेत. गावाचा विकास करताना कागदोपत्री कोणतीही अडचण येऊ नये, आवश्‍यक त्या मान्यता, प्रमाणपत्र त्वरीत मिळावे आणि कामाला गती मिळावी यासाठी सीईओ यांनी हा निर्णय घेतला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जिल्ह्यातील ग्रामपंचायत क्षेत्रात असलेली गाव, वाड्या-वस्त्या याठिकाणी पथदिवे बसवण्यात येतात. या पथदिव्यांची संख्या मोठी असते. त्यामुळे एखाद्या गावात पथदिवे बसवायचे असल्यास संबंधीत ग्रामपंचायतीला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचे “ना-हरकत’ प्रमाणपत्र असणे आवश्‍यक आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीला सर्व कागदी घोडे तयार करून वेळोवेळी जिल्हा परिषदेत पाठवायचे, त्यानंतर त्याची पाहणी करून ना-हरकत प्रमाणपत्र येत होते. मात्र, या प्रक्रियेमध्ये वेळ आणि कष्ट दोन्ही वाया जात होते.

त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तोडगा काढत, “ना-हरकत’ प्रमाणपत्र देण्याचे अधिकारी थेट गट विकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामध्ये एका ग्रामपंचायत क्षेत्रात एका वेळेस 100 खांब आणि दिवे (पथदिवे) बसविण्यासाठी लागणारे ना-हरकत प्रमाणपत्र गटविकास अधिकारी देतील; तर 101 किंवा त्यापुढील पथदिव्यांसाठी लागणारे ना-हरकत प्रमाणपत्र पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी देतील. याबाबतचे परिपत्रकच सीईओंनी काढले असून, या आदेशामुळे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी होणारी पायपीट कमी होणार असून, कामाला गती मिळण्यास मदत होणार आहे, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीणकर यांनी सांगितले.
…………….
पथदिवे बसवण्यासाठी लागणारे ना-हरकत प्रमाणपत्र देण्याचे अधिकारी गट विकास अधिकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत. दरम्यान, “ना-हरकत’ प्रमाणपत्रासाठी आलेली फाईल दहा दिवसांच्या आत निकाली निघाली पाहिजे, असा सूचनाही संबधीत अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
सुरज मांढरे – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)