पत्रसंवाद : कचरा कराचा भुर्दंड नागरिकांनी का द्यावा?

दररोज कोणता ना कोणता तरी कराचा बोजा सर्वसामान्य नागरिकांवर लादण्यात प्रशासन लोकप्रतिनिधी नेहमी सज्ज असतात. कारण सर्वसामान्य माणूस मूग गिळून गप्प बसलेला असतो. कोणत्याही जाचक वाटणाऱ्या करासंबंधात तो विरोध करण्याच्या भानगडीत पडत नाही, कारण त्याला दोन वेळच्या जेवणासाठी कष्ट करावे लागत आहे. त्यामुळे विरोध करण्यासाठी वेळच त्याच्याकडे नसतो. त्याचा फायदा प्रशासन, लोकप्रतिनिधी घेतात आणि नको नको ते कर त्याच्या माथी मारून पैसे गोळा करून विकासाच्या नावाखाली आणि आता कचऱ्याचे वर्गीकरण व विल्हेवाट लावण्यासाठी खास कचरा कर लावण्यात येणार आहे. या अगोदर पर घरटी कचरा नेण्यासाठी जे स्वयंसेवक येतात त्यांना दर महिन्याला शंभर ते दोनशे रुपये नाहक देण्याची पाळी नागरिकांवर आली आहे. कारण शहरातील सर्वच कंटेनर काढून टाकल्यामुळे कचरा कोठे टाकायचा हा प्रश्‍न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

शिवाय कचरा डेपोचा प्रश्‍न रेंगाळत पडला आहे म्हणे प्रत्येक प्रभागात कचरा प्रकल्प उभारून सुद्धा कचऱ्याचा प्रश्‍न दिवसेंदिवस गहन बनत चालला आहे. यावर प्रशासनाने कोणताही ठाम प्रोजेक्‍ट केलेला नाही. फक्‍त नवीन नवीन प्रोजेक्‍ट सल्लागार आणि चिरीमिरी यामुळे विकास तर सोडा पण आता हे नाहक जिझिया कर भरूनसुद्धा या समस्या सुटणार नाही. या करांच्या ओझ्याने सर्वसामान्य माणसांची गळचेपी वाढली आहे. कर्मचारी, अधिकारी, भ्रष्टाचार, मानधन, ठेकेदार, बोनस, उचल, सानुग्रह अनुदान, पेन्शन, वैद्यकीय मोफत उपचार, कार्यक्रम, जयंत्या, पुण्यतिथ्या यांच्या वरील दुकानदारी बंद केल्याशिवाय सर्वसामान्य माणसाला या करांच्या नावावर होणाऱ्या लुटीतून बाहेर पडण्यासाठी दबावतंत्राचा वापर केल्याशिवाय पर्याय नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आवाज उठवा, क्रांती करा नाहीतर करांच्या ओझ्याखाली दबून जीवनाची तारेवरची कसरत करत राहा. तसेच बुधवार पेठ गवळी आळी स्वच्छतागृहाजवळ कचऱ्याचा राडा-रोडा, दुर्गंधी सातत्याने असते. पुणे शहरातील अनेक स्वच्छतागृहांपाशी कचऱ्याचा राडारोडा पडलेला असतो तसेच स्वच्छतागृहे अस्वच्छ असतात त्यामुळे त्या भागात दुर्गंधी पसरलेली असते. असाच प्रकार बुधवार पेठ 970, गवळी आळीत असलेल्या स्वच्छतागृहाचा आहे. या ठिकाणी महापालिका प्रशासनाने जनजागृतीचा फलक लावलेला आहे. परंतु याकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष नसल्याने या ठिकाणी राडारोड्याचा खच पडलेला दिसतो.

कारण कचरा टाकण्यासाठी कंटेनर नसल्याने या ठिकाणी कचरा टाकला जात आहे. असाच प्रकार शहरभर दिसून येत आहे. नुसतेच फलक न लावता इच्छाशक्‍ती, नियोजन असू द्या! तेव्हाच असे प्रकार दिसणार नाहीत. यासाठी स्वच्छतागृहे कायम स्वच्छ ठेवा. त्याच्या आजूबाजूला कचरा टाकण्यासाठी मोकळी जागा ठेवू नका. तेव्हाच आजूबाजूचा परिसर स्वच्छ राहील. याचा महापालिका प्रशासनाने, आरोग्य विभाग यांनी गांभीर्याने या विषयावर विचार करून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. तरच कचरा कर मागणे प्रशस्त ठरेल.
– अनिल अगावणे, पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)