पत्रकारितेची युद्धभूमी व त्यांची सुरक्षितता! 

जयेश राणे 

मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक, प्राध्यापक, बहुभाषाज्ञानी आणि भारतीय इतिहास संशोधनाचे जनक म्हणून सुपरिचित असलेल्या ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांचा 18 मे या दिवशी पुण्यस्मरण दिवस आहे. त्यानिमित्त पत्रकारितेतील विविध सूत्रांचा वेध घेणे अत्यावश्‍यक ठरते. 

दर्पण म्हणजेच आरसा. या आरशामध्ये मुख्यत्वेकरून समाज आणि राष्ट्र दिसले पाहिजे. कारण हा आरसाच लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांना पदोपदी देश आणि समाजातील वस्तुनिष्ठ स्थितीचे दर्शन घडवत असतो. आरशाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये स्वतःचा चेहरा पाहिल्यावर स्वतःचाच चेहरा दिसता; दुसऱ्याचा नाही. त्यामुळे “दर्पण’कारांच्या “दर्पण’ या नावामध्येच किती व्यापक अर्थ आहे, हे ठळकपणे लक्षात येते.

लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून प्रसारमाध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. माहिती म्हणजेच ज्ञान. ज्ञान हे वाटल्याने वाढते आणि त्यातूनच अज्ञान दूर होत असते. अर्थातच यामुळे वास्तवाशी परिचय होत असतो. विस्तवाशी (समाज कंटक, राष्ट्रद्रोही) खेळून वास्तवाशी परिचय घडवून आणण्याचा आटापिटा करणे, असे अत्यंत जिकिरीचे काम करणे म्हणजे साहसच होय. हे साहस दाखवण्यासाठी अविरतपणे झटणे हे कोणा येरागबाळ्याचे काम नाही. पत्रकारिता या क्षेत्रातील साहस हे वस्तुनिष्ठ घडामोडींशी संबंधित असल्याने या साहसाची तुलना अन्य कोणत्याही साहसाशी होणे अशक्‍यप्राय आहे.

प्रसारमाध्यमे अनेक गोष्टी त्यांच्या दर्पणातून (वाहिन्या, नियतकालिके) दाखवत, मांडत असतात. त्यामुळे सुस्त असलेले प्रशासन खडबडून जागे होत असते, तर काही वेळेस झोपण्याचे सोंगही करत असते. हे झोपण्याचे सोंग म्हणजे निव्वळ ढोंग होय. यामुळे समाज आणि राष्ट्र यांची अपरिमित हानी होते. समाजाशी अधिक जोडले जाण्यासाठी अनेक प्रसारमाध्यमांनी समाजमाध्यमांचा उपयोग वाढवला आहे. त्यामुळे समाज मनातील गोष्टी चटकन जाणून घेणे सोपे झाले आहे. नागरिकांचाही या गोष्टीला उत्तम प्रतिसाद असल्याने अनेक सामाजिक समस्या चव्हाट्यावर येण्यास मदत होत आहे. समाजाच्या समस्या सोडवणाऱ्या उत्तरदायी मंडळींनीही (प्रशासन आणि लोकप्रतिनिधी) त्याला प्रतिसाद देण्याची गती वाढवली पाहिजे. देशातील नागरिक पुष्कळ संयमी आहेत. त्यामुळे अडचणींना तोंड द्यावे लागले तरी सहजपणे जनक्षोभ उसळत नाही. हेच सुस्त प्रशासन आणि कर्तव्यचुकार लोकप्रतिनिधी यांच्या पथ्यावर पडणारे असते. त्यामुळे या दोन्हीही घटकांसमोर समाजाच्या व्यथा मांडत रहाणे, त्यांचा पाठपुरावा ठेवून त्या सोडवणे, असे महत्त्वपूर्ण दायित्व प्रसारमाध्यमांवरच असल्याने याविषयीची त्यांची सतर्कता खूप मोलाची आहे.

लेखणीची चपराक ही प्रत्यक्ष चपराकीपेक्षा उत्तमप्रकारे बसते. त्यामुळे अनेक कर्तव्यचुकार मंडळींची सत्य गोष्टी वाचल्यावर तळपायाची आग मस्तकात जाते. पण सत्य वाचल्यावर, ऐकल्यावर असे का व्हावे? कारण सत्याची मात्रा सर्वांनाच पचनी पडत नसते. त्यामुळे माध्यमांच्या ‘दर्पणा’तून सत्यकथन होऊ लागल्यावर पळताभुई थोडी होऊ लागणार असल्याने, ती अस्वस्थता कर्तव्यचुकार व्यक्तीला स्वस्थ बसू देत नाही.

इलेक्‍ट्रॉनिक प्रसारमाध्यमांतून संपूर्ण दिवस विविध घडामोडी पाहण्यास मिळत असतात. त्यामुळे समाज हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी जोडला जाण्यास साहाय्य झाले आहे. येथील व्यासपीठावर नियमितपणे अनेक विषयांवर चर्चासत्रे होत असतात. यामुळे चर्चासत्रातील जवळपास 1 तास तरी समाजाला चर्चासत्रात चर्चिल्या जात असलेल्या विषयातून माहिती मिळत असते. समाज हा घटक कायम जागृतच असणे अनिवार्य आहे. कारण जागृत समाजच सत्य आणि असत्य यांतील भेद विचारपूर्वक पडताळू शकतो. निद्रिस्त समाज गंभीर विषयांकडेही केवळ मनोरंजन म्हणून पाहात असतो.

समाजाला सतावत असलेल्या विविध समस्यांचे उच्चाटन करण्यासाठी या क्षेत्रात वाईट प्रवृत्तीच्या माध्यमातून फोफावलेल्या ‘भ्रष्टाचारा’चे समूळ उच्चाटन होणे अनिवार्य आहे. विचारांची ताकद कमकुवत करण्याचा हा घृणास्पदप्रकार थांबला पाहिजे. असे झाल्यावर समाजाला अधिक वस्तुनिष्ठ पत्रकारितेचा अनुभव करता येईल. वैचारिक प्रदूषण हे वायू आणि जलप्रदूषणाएवढेच घातक असते. याचा प्रसार प्रचंड वेगाने होत असतो. देशामध्ये या तीनही प्रदूषणांनी कहर केला आहे. वैचारिक प्रदूषण नियंत्रणात आणणे प्रसारमाध्यमांना सहज शक्‍य आहे. त्यासाठी त्यांनी कंबर कसली पाहिजे.

प्रसारमाध्यमांवर दबाव टाकण्यासाठी पत्रकारांवर प्राणघातक आक्रमणे केली जातात, त्यांची हत्या केली जाते. भाडोत्री गुंडांना वचकून राहावे आणि त्यांना जे करायचे आहे त्यासाठी रान मोकळे मिळावे यासाठी सत्याचे शत्रू असणारे ते दाबण्यासाठी कायमच कस लावत असतात. दुर्दैवाने पत्रकारच अधिकपणे त्यांचे भक्ष्य बनतात. प्रत्येकास स्वतःच्या क्षेत्रात मोकळेपणाने काम करण्यास मिळाले पाहिजे. पत्रकारिता क्षेत्रात याची आवश्‍यकता ठळकपणे अधोरेखित होते. स्त्रियांवरील अत्याचारांत वाढ होत आहे, माहिती अधिकारात माहिती मागवणाऱ्या नागरिकांवरही भ्याड आक्रमणे होत आहेत, त्यांना धमक्‍याही दिल्या जात असतात. वाईट गोष्टींना खतपाणी घालणाऱ्यांना कठोर शासन झाले पाहिजे, ही नागरिकांची इच्छा आहे.

गुन्हेगारास पोलिसांची भीती असते, म्हणून तो पोलिसांपासून पळ काढत असतो. त्याचप्रमाणे अपप्रकार करणाऱ्यांना पत्रकारांची भीती वाटत असते. विचार स्वातंत्र्याचा गळा घोटणारे मोकाट असणे समाजाच्या दृष्टीने धोकादायकच आहे. अविचाराने वागणाऱ्यांचा सुविचारांशी संबंधच नाही. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी त्यांच्या वर्मावर बोट ठेवले की ते चवताळून उठतात. अपप्रकारही करायचे आणि त्याच्या विरुद्ध आवाज उठवला की गुंडांनी आदळआपट ही करायची, ही सोंग नागरिकांनी का बघायची ? विचार आणि अविचार या दोन्ही परस्पर विरोधी बाबी आहेत. एक लेखणीने समाजासाठी, तर दुसरा हत्याराने मतलबीपणासाठी लढत असतो. समाजाला त्यातील दुसऱ्याविषयी प्रचंड चीड आहे. ती व्यक्त करण्याचे माध्यम म्हणजेच प्रसारमाध्यम होय. प्रसारमाध्यमांपासून आपली लबाडी लपवण्यासाठी त्यांच्यावर दहशत बसवणाऱ्या गुंडांना अद्दल घडवणे अनिवार्य आहे, तसेच पत्रकारितेच्या युद्धभूमीवरील साहसी योध्यांचे (पत्रकार) रक्षण होणे उत्तम समाज आणि राष्ट्र यांच्या निर्मितीसाठी आवश्‍यक आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

2 COMMENTS

  1. वरील लेख वाचण्यात आला वरील सर्व विचार जर प्रत्यक्षात कृतीने उतारावेत अशी अपेक्षा असेल तर समाजात साक्षरतेचे प्रमाण हे किती असावे ? ह्याचा वरील लेखात का विचार करण्यात आला नाही ? जपान मधील प्रसारमाध्यमांचे म्हणजेच वृत्तपत्रांचे नियम येथे नमूद करणे गरजेचे वाटते १ ) जपान मध्ये वृत्तपत्राना संपूर्ण मतस्वात्यंत्र आहे २) सेन्सॉरशिप कीव्हवा इतर कोणत्याही मार्गाने सरकार वृत्तपत्रांच्या कारभारात ढालवाढवळ करीत नाही ३) सरकार दडपण आणायाचा प्रयत्न करीत नाही ४) सरकारचे व प्रसारमाध्यमांचे कोणतेही मतभेद असले तरी जेव्हा संबंध जपानचे हितसंबंध राखण्याचा प्रश्न येतो , तेव्हा प्रसारमाध्यमे सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहते ५) प्रदेशात देशाची प्रतिमा उजळ व्हावी हे सरकार व वृत्तपत्रे ह्यांचे सामान ध्येय असते ६) कोणत्या जाहिराती वृत्तपत्रानी स्वीकाराव्यात या बद्दल संघटनेची कडक आचारसंहिता आहे उदा .प्रदेशातील आणि देशातील नेत्यांची वयक्तिक बदनामी , नशिबावर विसंबून राहण्याला उत्तेजन देणे इतरांच्या मतांची निंदा करणे ,बलात्कार नि हिंसाचार ह्यांना प्रोत्साहन देणे अशा अपप्रवृत्तीची व्यक्त करणाऱ्या जाहिराती जपानी वृत्तपत्रे स्वीकारीत नाहीत ६) जपान मध्ये लेखकना साडेबारा ते 15% रॉयल्टी मिळते आता अमेरिकेतील वृत्तपत्रां बाबत १) वृत्तपत्रीय स्वातयंत्राबद्दल वृत्तपत्रात काय छापावे आणि काय छापूनये याबाबतची सक्ती होता कामा नये वृत्तपत्रे खर्या अर्थाने स्वतंत्र असली पाहिजेतच २) वृत्तपत्रांवर व्यापारी वर्गांचे व जाहिरातदारांचे वजन येता कामा नये ३)

  2. ३) अमेरिकन जीवनाचा दुसरा एक विशेष हा कि त्या ठिकाणी वृत्तपत्रे आकाशवाणी आणि चित्रवाणी या प्रचार साधनांचा फारमोथ्या प्रमाणावर उपयोग केला जातो तेथील राष्ट्रीय वृत्तपत्रे वरच्या दर्ज्याची असतात ४)न्यूयॉर्क टाइम्स वॉशिंग्टन पोस्ट व ख्रिश्चन सायन्स मॉनिटर या तीन वृत्तपत्रांचा उल्लेख होतो ५) जगातील सर्वात उत्कृष्ट वृत्तपत्र म्हणून न्यूयॉर्क टाइम्स समजण्यात येते ६) अमेरिकेतील कोणतेही वृत्तपत्र हे सरकारी किंवा निमसरकारी वृत्तपत्र म्हणून आणि सरकारी धोरणाला पाठिंबा देणारे म्हणून ओळखले जात नाही ७) अमेरिकेतील वर्तमानपत्रे संपुर्णतःअ स्वतंत्र असतात आपल्या देशातील किती वृत्तपत्रे हि वरील नियमात बसणारी पाहावयास मिळतील ? एकतारी शोधून सापडेल का ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)