पत्रकारावर हल्ला करणाऱ्या दोघांना बेड्या

एसलसीबी व शिरवळ पोलीसांची कारवाई; सुत्रधार अद्याप मोकाट

सातारा,दि.28(प्रतिनिधी)

शिरवळ ता.खंडाळा येथील पत्रकार मुराद पटेल यांच्यावर जिवघेणा हल्ला करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने पुण्यातून बेड्या ठोकल्या आहेत. ताब्यातील दोघांनी धार्मीक कारणावरूनच पटेल यांच्यावर हल्ला केल्याची कबुली दिली आहे. असे असले तरी या प्रकरणाचा सुत्रधार अद्याप मोकाटच असल्याने हल्ला नेमका कोणत्या कारणाने झाला याचा नेमका उलगडा झालेला नाही. ईस्माइल मकानदार, रोहन पवार (दोघे रा.संतोषनगर, कात्रज पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

शिरवळ ता. खंडाळा येथे दि. 11 एप्रिल रोजी दुचाकींवरून आलेल्या काही तरूणांनी पत्रकार मुराद पटेल यांच्यावर सत्तूर, चाकू व दगडाच्या सहाय्याने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये पटेल हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तेथीलच एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

शिरवळ येथील मुराद गौस पटेल दि. 11 रात्री दहा वाजण्याच्या सुमारास न्यू कॉलनी परिसरातून त्यांचे मामा जाकीर पठाण यांच्या घरी पायी चालत गेले. तेथून त्यांनी ते त्यांची दुचाकी घरी जात असतानाच, ईश्‍वरनगरी परिसरातील एका विट भट्टीजवळ दोन दुचाकीवरून आलेल्या तरूणांनी पटेल यांच्यावर हल्ला केला होता.

पटेल यांच्यावर सत्तूरसारख्या हत्याराने कपाळावर, खांद्यावर, उजव्या हाताच्या मनगटावर, डाव्या पायाच्या पोटरीवर, गुडघ्यावर व नडगीवर वार केल होते. दरम्यान पटेल यांनी आरडाओरडा केल्याने परिसरातील लोकांनी घटनास्थळी दाव घेतली. यानंतर हल्लेखोर पसार झाले होते. त्यानंतर या घटनेची माहिती कळताच पत्रकारांतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

घटनेच्या दुसऱ्या दिवशी दुपारी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, कार्याध्यक्ष शरद काटकर, सचिव दिपक प्रभावळकर, सातारा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, राहूल तपासे, सुजित आंबेकर, आदी पत्रकारांनी भ्याड हल्ल्याचा निषेध करीत हल्लेखोरावर त्वरीत कारवाई करून अटक करण्याची मागणी जिल्हा पोलीस दलाकडे केली होती.

या मागणीचा अन्‌ हल्ल्याच्या घटनेला गांभीर्याने घेत जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी कारवाईच्या सुचान दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा शिरवळ पोलीस आरोपींच्या शोधात होते. दरम्यान काही आरोपी हे कात्रज येथील संतोषनगर परिसरात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला शनिवार दि.27 रोजी मिळाली होती.

मिळालेल्या माहिती नुसार एलसीबी व शिरवल पोलीस ठाण्याच्या दोन पथकांनी पुण्यातून आरोपींना ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी ताब्यातील दोघांना शिरवळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील यांच्या मागदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक विजय कुंभार, विनायक वेताळ यांच्या सुचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव,सहाय्यक फौजदार मोहन घोरपडे,हवालदार उत्तम दबडे, संतोष पवार, मुबीन मुलाणी, नितीन गोगावले,निलेश काटकर, वैभव सावंत, संजय जाधव. विजय सावंत तसेच शिरवळ पोलीस ठाण्याचे फौजदार सागर अरगडे, राजू अहिरराव, संतोष मठपती, वैभव सुर्यवंशी यांनी केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)