पत्नी, मुलगी सासऱ्यासह पाच जणांवर चाकुने वार : हडपसरमधील घटना

हल्ल्यानंतर पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

पुणे- किरकोळ कारणावरून एका 35 वर्षीय व्यक्तीने पत्नी, चार वर्षांची मुलगी, सासरा, चुलत सासरा आणि चुलत मेहुणा अशा पाच जणांवर चाकूने वार केले. त्यानंतर त्याने स्वत:च्याही गळ्यावर चाकूने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना हडपसर, काळेपडळ येथील काळेबोराटे नगर येथे घडली. यातील सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मिलिंद शहाजी कसबे (35, फुरसुंगी) असे त्याचे नाव आहे. त्याची प्रकृती गंभीर असून ससूनमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिलिंद हा मूळचा उस्मानाबादचा आहे. तो पत्नी आणि मुलीसह फुरसुंगी येथे वास्तव्यास आहे. तो पुण्यात रंगकाम करतो. तर त्याच्या पत्नीचे कुटुंबीय काळेबोराटे नगर परिसरात राहण्यास आहेत. मागील दोन दिवसांपासून ती तिच्या आई-वडिलांच्या घरी राहण्यास गेली होती. त्याचदरम्यान मिलिंदचे आई-वडीलही उस्मानाबादहून आले होते. त्यांनी त्याची पत्नी आणि त्याला उस्मानाबादला परत येण्यास सांगितले. त्यानुसार तो तिला घेऊन जाण्यासाठी सासरच्या मंडळींकडे गेला. त्याच्या सासऱ्याने त्याला “गावाकडे पाऊस खूप सुरू आहे. तेथील घराची स्थिती वाईट आहे. दोन दिवसांनी घेऊन जा’ असे सांगितले. याच कारणावरून तो गुरुवारी सायंकाळी काळेबोराटे नगर येथे सासऱ्याच्या घरी तीक्ष्ण हत्यार घेऊन गेला. या हत्याराने त्याने पत्नी, चार वर्षांची मुलगी, सासरा, चुलत सासरा आणि चुलत मेव्हणा अशा चौघांवर या हत्याराने वार केले. त्यानंतर स्वत:च्या गळ्यावर वार केले. या प्रकाराने घरात गोंधळ उडाला. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले. मिलिंद कसबे याची प्रकृती गंभीर आहे. तर इतर सर्वांवर उपचार सुरु आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)