पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा

वाकी- माहेराहून पैसे आणावेत, यासाठी सासरी नांदत असलेल्या पत्नीस शिवीगाळ, दमदाटी करून तिचे जगणे मुश्‍कील करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिच्या वाफगाव येथील पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुपाली संतोष मांदळे (वय 30 वर्षे, रा. वाफगाव, ता. खेड) या विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी तिचा पती संतोष नाथा मांदळे (वय 32 वर्षे, रा. वाफगाव, मांदळेवाडी, ता. खेड) याच्यावर गुन्हा दाखल केला. रुपाली हिचे वडील वामन महादेव रोकडे (वय 62 वर्षे, रा. वाकी खुर्द, ता. खेड) यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, रुपाली हि वाफगाव येथील मांदळेवाडी येथे सासरी नांदत असताना सन 2010 पासून तिचा किरकोळ कारणावरून तिच्या सासरचे मंडळी तिला जाणूनबुजून त्रास देत होते. माहेराहून पैसे आणावेत, यासाठी तिला उपाशीपोटी ठेवून शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण करून तिचा छळ केला जात होता. दररोज होत असलेल्या या जाचाला वैतागून रुपाली हि तिच्या दोन लेकरांना राहत्या घरात सोडून वाफगाव (ता. खेड) येथून शुक्रवारी (दि. 27 जुलै) सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या दरम्यान ती निघून गेली होती. त्या दिवशी ती रात्री उशिरापर्यंत परत घरी न आल्याने ती बेपत्ता झाल्याची फिर्याद राजगुरुनगर (ता.खेड) येथील पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. तेव्हापासून तिचे नातेवाईक आणि येथील पोलीस तिचा शोध घेत होते. मात्र, गेले सहा दिवस सर्वत्र शोध घेऊनही तिचा काहीच ठावठिकाणा लागत नव्हता. अखेर सातव्या दिवशी बुधवारी (दि. 1 ऑगस्ट) सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान नदी लगत काही मुले जनावरे चारत होती. त्यावेळी त्यांना नदी पात्रात एका महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. त्यांनी तातडीने याबाबतची माहिती वाकी बुद्रुक संतोषनगरचे पोलीस पाटील अजित मच्छिंद्र कड (वय 36 वर्षे, रा.वाकी, ता. खेड) यांना दिली. कड यांनी तातडीने चाकण पोलिसांना याबबत कळविले. घटनास्थळावर तातडीने दाखल झालेल्या पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून उपस्थित नागरिकांच्या मदतीने रुपाली मांदळे हिचा पाण्यावर तरंगलेला मृतदेह पाण्याबाहेर काढला. चाकण पोलिसांनी रुपाली हिचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणी नंतर याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद केली होती. मात्र, रुपाली हिला दररोज होत असलेल्या जाचामुळे तिने पुणे-नाशिक महामार्गावरील वाकी बुद्रुक (ता. खेड) गावच्या हद्दीतील भामा नदीच्या पात्रात आत्महत्या केली आहे. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी रोकडे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तिचा पती संतोष मांदळे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)