पत्नीच्या नावे घरखरेदी फायदेशीर (भाग-१)

पत्नीच्या नावाने अचल मालमत्तेत केलेली गुंतवणूक अनेक मार्गांनी लाभदायक ठरते. पत्नीच्या नावे खरेदी केलेले घर भाड्याने देता येते आणि भाड्यातून मिळणारे उत्पन्न 30 टक्‍के वजावट केल्यानंतरच करपात्र ठरते. तसेच पत्नीच्या नावे घर घेताना नातेवाइकांकडूनही व्याजाने कर्ज घेता येते. त्यामुळे त्यात केलेली गुंतवणूकही करपात्र ठरत नाही. निवृत्तीनंतरचे नियोजन आणि पत्नीची आर्थिक सुरक्षितता या दोन्ही बाबतीत तिच्या नावे घर असणे लाभदायक ठरते.

विवाहित महिला मिळालेल्या भेटी किंवा कर्जाच्या आधारे व्यक्तिगतरीत्या आपली संपत्ती उभारू शकते. विवाहित महिला जर करभरणा करणारी असेल, तर आपल्या नावे घर असणेही तिच्यासाठी हितावह ठरते. काही बाबतीत प्राप्तिकराच्या दृष्टीने करदात्याच्या पत्नीकडून किंवा कुटुंबातील प्रमुख पुरुष सदस्याकडून घर विकत घेणे किंवा बांधणे उचित ठरते. जर पत्नीकडे गुंतवणूक करण्यायोग्य स्वतंत्र धन असेल किंवा ती कमावती असेल, तिच्याकडे उत्पन्नाचा स्वतंत्र स्रोत असेल, तर ती त्यातून स्वतःच्या नावावर मालमत्ता खरेदी करू शकते किंवा आपल्या नावावर जमीन विकत घेऊन घराचे बांधकाम करू शकते. स्त्री आपल्या नावावर तसेच संयुक्त नावावर म्हणजे, एक नाव तिचे आणि दुसरे नाव कुटुंबातील अन्य सदस्याचे अशा स्वरूपातही मालमत्ता खरेदी करू शकते.

घराचे बांधकाम किंवा खरेदी करण्यासाठी जर पत्नीकडे असलेली रक्कम अपुरी पडत असेल, तर त्या उद्देशाने ती पैसे उधार घेऊ शकते. घरात गुंतवणूक करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीकडून उधार पैसे घेण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत आणि ज्यांच्याकडून रक्कम उधार घ्यायची, त्या व्यक्तींमध्ये तिचा पती, सासरा किंवा सासूचाही समावेश असू शकतो. त्याचप्रमाणे स्त्री आपल्या मुलाकडून, भावाकडून, बहिणीकडून, तसेच इतर नातेवाइक किंवा मित्रांकडून पैसे उधार घेऊ शकते. ती बॅंक किंवा अन्य वित्तसंस्थांमार्फतही पैशांची उभारणी करू शकते. परंतु कोणत्याही उधार घेतलेल्या रकमेवर उचित व्याज देणे गरजेचे असते. अन्यथा प्राप्तिकर अधिकारी हे घर म्हणजे संबंधित नातेवाइकांकडून तिला मिळालेले बक्षीस आहे, असा आरोप करू शकतात.

पत्नीच्या नावे घरखरेदी फायदेशीर (भाग-२)

जर पत्नीने तिच्या नावावर किंवा कुटुंबातील अन्य सदस्याच्या नावावर संयुक्तपणे घर खरेदी केले किंवा घर बांधताना अशा प्रकारे सावधगिरीचे निर्णय घेतले तर संबंधित घरापासून उत्पन्न मिळू लागले तरी त्या उत्पन्नाच्या सोयीसाठीही वेगळी तजवीज करावी लागते. काही वेळा पत्नी आपल्या पतीलाच व्यवसायासाठी ते घर भाड्याने देऊ शकते. परंतु पत्नीकडून घेतले जाणारे भाडे त्याच विभागातील समकक्ष घरांच्या भाड्याशी मिळते-जुळते असायला हवे. जर एखाद्याला आपल्या पत्नीच्या नावाने वेगळे घर घ्यायचे असेल, तर सर्वांत आधी एक गोष्ट स्पष्ट करणे आवश्‍यक आहे, ती म्हणजे किमान सुरुवातीचे डाऊन पेमेन्ट पत्नीने द्यायला हवे आणि उर्वरित रक्कम ती कर्जाऊ घेऊ शकते. मित्रांकडून किंवा नातेवाइकांकडूनही व्याजाने रक्कम घेतली जाऊ शकते. परंतु पती, सासू, सासरे यांच्याकडून तसेच नातेवाइकांकडून कर्जाऊ घेतलेली कोणतीही रक्कम बिनव्याजी असता कामा नये. पत्नीच्या नावावर खरेदी केलेल्या मालमत्तेला संपत्ती करातून पूर्णपणे सूट दिली जाते.
संपत्ती कराचा विचार करायचा झाला तरी पत्नीच्या नावाने अचल मालमत्ता खरेदी करणे फायद्याचे ठरते. या ठिकाणी लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे कोणत्याही करदात्याला पाचशे चौरस मीटर जमिनीच्या तुकड्यावर संपत्ती कर भरावा लागत नाही. अर्थात, वेगवेगळ्या राज्यांमध्ये यासंबंधी वेगवेगळे नियम आहेत. संपत्ती करातील या सुटीला सामान्यतः कोणत्याही कमाल मर्यादेची अट असत नाही. परंतु पत्नीच्या नावे मात्र आलिशान बंगला असेल, तरी तो संपत्ती करातून पूर्णपणे मुक्त असतो. वस्तुतः कुटुंबातील प्रत्येक सदस्याने आपल्या नावे मालमत्ता खरेदी करणे हा खूपच धोरणीपणाचा निर्णय ठरतो. एकल किंवा विभक्त कुटुंबांसाठी तर हा निर्णय अत्यंत डोळसपणाचा ठरतो. कारण त्यामुळे संपत्ती कर वाचविता येतो.

– जगदीश काळे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)