पत्नीच्या नावे घरखरेदी फायदेशीर (भाग-२)

पत्नीच्या नावाने अचल मालमत्तेत केलेली गुंतवणूक अनेक मार्गांनी लाभदायक ठरते. पत्नीच्या नावे खरेदी केलेले घर भाड्याने देता येते आणि भाड्यातून मिळणारे उत्पन्न 30 टक्‍के वजावट केल्यानंतरच करपात्र ठरते. तसेच पत्नीच्या नावे घर घेताना नातेवाइकांकडूनही व्याजाने कर्ज घेता येते. त्यामुळे त्यात केलेली गुंतवणूकही करपात्र ठरत नाही. निवृत्तीनंतरचे नियोजन आणि पत्नीची आर्थिक सुरक्षितता या दोन्ही बाबतीत तिच्या नावे घर असणे लाभदायक ठरते.

पत्नीच्या नावे घरखरेदी फायदेशीर (भाग-१)

नोकरदार करदात्यांच्या दृष्टीने पत्नीच्या नावे अचल संपत्तीची खरेदी करणे हा चांगला पर्याय ठरू शकतो. जर रहिवासासाठी मालमत्ता खरेदी केली असेल आणि पतीला त्याच्या कंपनीकडून किंवा मालकाकडून घरभाडे भत्ता प्राप्त होत असेल, तर अशा स्थितीत पती खूपच बचत करू शकतो. कारण तो ज्या घरात राहतो, ते त्याच्या पत्नीच्या नावे असते आणि आपल्याला मिळणाऱ्या घरभाडे भत्त्यातून तो पत्नीला घरभाडे देत आहे, असे मानले जाऊ शकते. पत्नीने तिच्या नावे असलेले हे घर पती ज्या कंपनीत काम करतो, त्या कंपनीलाच भाड्याने दिले तरी चालू शकते. यात एक कमतरता अशी आहे की, पत्नीच्या पैशांतून केलेली गुंतवणूक खऱ्या अर्थाने कोणतेही वास्तविक उत्पन्न प्राप्त करीत नाही. परंतु पत्नीच्या नावाने मालमत्ता खरेदी केल्यामुळे प्राप्तिकराचा सरासरी दर मात्र कमी होतो आणि त्यालाच त्या मालमत्तेतून मिळालेले उत्पन्न मानता येते. एका कारणासाठी हे अधिक फायदेशीर आहे आणि ते कारण म्हणजे पत्नीच्या अचल मालमत्तेमधून मिळणाऱ्या उत्पन्नाची गणना करताना भाड्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून 30 टक्के वजावट करून उर्वरित उत्पन्न प्राप्तिकर अधिकाऱ्यांना दाखविण्याचा तिला हक्क आहे. मालमत्तेवर पत्नीकडून कोणताही खर्च न करताही ही कपात स्वीकारार्ह असते. अशा प्रकारे पत्नीकडून देय योग्य सरासरी प्राप्तिकर 30 टक्‍क्‍यांपर्यंत कमी होतो. वास्तवात हा एक मोठा फायदा आहे आणि तो कोणत्याही व्यक्तीला आपल्या अचल मालमत्तेत पत्नीच्या नावाने गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित करतो.

-Ads-

जर मालमत्ता पत्नीच्या नावाने असेल तर भांडवली लाभ आणि भांडवली लाभांवरील करात बचत करण्यासंबंधी तयार करण्यात आलेल्या योजनांचा लाभ घेता येणे शक्‍य असते. समजा, तुमच्या पत्नीच्या नावावर कोणत्याही प्रकारची अचल संपत्ती नाही आणि तिने शेअर वगैरे विकून दीर्घकालीन भांडवली लाभ प्राप्त केला, तर रहिवासी मालमत्तेत त्याची गुंतवणूक करणे उचित ठरते. त्यायोगे दीर्घकालीन भांडवली लाभावर लागू शकणारा कर पूर्णपणे वाचविता येऊ शकतो. जर पत्नीच्या नावावर असलेली मालमत्ता विकली आणि त्यातून दीर्घकालीन भांडवली लाभ मिळाला, तर त्यावर लागू होऊ शकणारा कर पूर्णपणे वाचविता येऊ शकतो. हा भांडवली लाभ एन. एच. ए. आय. किंवा आर. ई. सी. कडून जारी करण्यात आलेल्या ऋणपत्रांमधील सुधारित अशा 54 ई. सी. या मालिकेत गुंतविल्यास हा लाभ मिळू शकतो. तात्पर्य, सेवानिवृत्तीनंतरचे नियोजन आणि पत्नीच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी पत्नीच्या नावावर किमान एका घरात गुंतवणूक करणे अत्यंत फायदेशीर ठरते. पत्नीच्या नावे मालमत्तेत केलेली गुंतवणूक अनेक अर्थांनी लाभदायक आहे, हाच या साऱ्या चर्चेचा निष्कर्ष होय.

– जगदीश काळे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)