पत्नीचा त्रासामुळे पतीची आत्महत्या

वैवाहिक कलहातून घटना

पिंपरी – पती-पत्नीतील नातं हे काचेच्या भांड्यासारखा असतं. त्याला जपून ठेवलं, तर चकाकत राहतं; मात्र त्याला एक तडा गेला, तर त्यातून अनर्थ घडतो. त्याचीच प्रचिती गेल्या चार दिवसांतील घटनांनी येते. या घटना विचार करायला भाग पाडणाऱ्या आहेत. वैवाहिक जीवनातील नैराश्‍य हे केवळ पत्नीचाच जीव घेणारे नाही, तर पतीचाही जीव घेणारे ठरत आहे.

-Ads-

चिखली येथे घडलेल्या घटनेने या समस्येचे गांभीर्य समोर आले आहे. या घटनेत पत्नी वारंवार मित्रांमध्ये अपमान करत असल्याने तसेच वेगवेगळ्या कारणांवरून छळ करत असल्याने त्रासलेल्या पतीने आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी पत्नीला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तृप्ती जय तेलवाणी (वय 21) असे अटक महिलेचे नाव आहे. याप्रकरणी कांचन देवीदास तेलवाणी (वय 40, रा. काळेवाडी) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. जय देवीदास तेलवाणी (वय 25, रा. श्री साई सोसायटी, घरकुल, मोरे वस्ती, चिखली) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे.

आरोपी तृप्ती हिने पती जय यास घरगुती कारणावरून तसेच वारंवार पैशांची मागणी करीत छळ केला. आरोपीने स्वतःच्या जीवाचे बरे-वाईट करण्याची धमकी दिली. तसेच पतीने पैसे न दिल्याने त्यास शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली. यापुढे जाऊन आरोपीने आपल्या पतीला कॅन्सर झाला असल्याचा टिक टॉक व्हिडिओ बनवून तो त्याच्या मित्रांना दाखवून पतीची बदनामी केली. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

सोमवार दि. 3 ला घडलेल्या घटनेत पतीचा संशय, सासरच्यांची वाढती पैशाची मागणी व यातून होणारी मारहाण व त्याला कांटाळून महिलेने पिंपरी येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. तर वाकड येथील घटनेत पतीने घटस्फोटासाठी थेट एचआयव्हीचे इंजेक्‍शन दिले. या साऱ्या घटना माणुसकीला काळीमा फासणाऱ्या तर आहेतच; पण ज्या व्यक्‍तीला जीवनाचा साथीदार मानतो, तीच व्यक्‍ती केवळ पैशासाठी जीव घेण्यापर्यंत छळ करत असल्याचे पाहायला मिळत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलीस उप निरीक्षक रत्ना सावंत तपास करीत आहेत.

पती-पत्नीतील संवाद कमी झाला आहे. तसेच मोबाईलमध्ये सतत गुंतून राहाण्याने संशयाचा आजार दाम्पत्याना जडत आहे. त्यातून आर्थिक ओढाताण, नोकरीवरील तणाव या साऱ्यातून होणाऱ्या भांडणातून टोकाची पावले उचलली जातात. याचे बळी मुले व मुली दोघेही आहेत. त्यासाठी जोडीदारावर विश्‍वास ठेवा, दिवसातून एक तास तरी स्वतःला द्या, वेळ प्रसंगी मन मोकळं करा, कुढत बसू नका. तसेच वैवाहीक जीवनात गरज भासल्यास डॉक्‍टरांकडून समुपदेशन घ्या, ज्यामुळे टोकाचे पाऊल उचलण्याऐवजी काही तरी मार्ग निघेल व अनर्थ टळेल!
– डॉ. सुरेशकुमार मेहता, मानसोपचार तज्ज्ञ.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)