पत्नीचा खून केल्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी झाला पसार

पोलिसांना धक्काबुक्की करून शिवाजी रस्त्यावरून तो पळाला

पुणे – पत्नीचा खून केल्याप्रकरणात सिंहगड रोड पोलिसांनी अटक केलेला सराईत पोलिसांच्या ताब्यातून पसार झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. पोलिसांना धक्काबुक्की करून फरासखाना पोलीस स्टेशनसमोरून त्या आरोपीने पलायन केले.
राहुल राजेश हंडाळ (वय 22, अंकुश पॅलेस, कुटे मळा मानाजीनगर, नऱ्हेगाव) असे पलायने केलेल्याचे नाव आहे. त्याने चारित्र्याच्या संशयावरुन 26 एप्रिलला पत्नी कोमल (वय 22) यांचा मारहाण करून आणि गळा आवळून खून केला होता. एवढे करून तो थांबला नाही. तर त्याने पत्नीचा मृतदेह छताला लटकावला. मृतदेहाला नवी साडी नेसवली. मंगळसूत्र घातले. लिपस्टिक लावून क्रुरतेची परिसिमा गाठली होती. त्यानंतर पत्नीचा खून केल्याची माहिती एसएमएस, व्हॉट्‌सअपवरून नातेवाईकांना दिली होती. या प्रकरणात सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी घटनेनंतर दोन तासात राहुल याला अटक केली आहे. त्याला 1 मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या आदेशाने त्याला फरासखाना-विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या कोठडीत (लॉकअप) ठेवण्यात आले होते. शनिवारी वैद्यकीय तपासणी करण्यासाठी त्याला ससून रुग्णालयात नेण्यात आले होते. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर दुपारी फरासखाना पोलीस स्टेशनच्या कोठडीत ठेवण्यासाठी त्याला नेण्यात येत होते. गाडीतून उतरत असताना त्याच्यासोबत असलेल्या पोलिसांना धक्का देऊन राहुल पसार झाला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. मात्र, शिवाजी रस्त्यावरील असलेल्या गर्दीत तो सापडला नाही. याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पसार झालेला आरोपी राहुलचा शोध घेण्यासाठी सिंहगड पोलिसांकडून पथके तयार करण्यात आली आहे. तो सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)