पतसंस्था पदाधिकारी, कर्मचाऱ्यांचे गुरुवारी आंदोलन 

सुरेश वाबळे यांची माहिती : पतसंस्थांच्या विविध प्रश्‍नांवर शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न

राहुरी – थकबाकीदारांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सहजसुलभ परंतु कठोर व्हावी, पतसंस्थेच्या ठेवींना विमा संरक्षण मिळावे, नियामक मंडळ रद्द करावे, कामकाज करताना येत असलेल्या विविध अडचणींची सोडवणूक करण्यात यावी, आदी मागण्यांसाठी गुरुवारी (दि. 20) संपूर्ण जिल्ह्यातील सहकारी पतसंस्था बंद ठेवून पदाधिकारी व कर्मचारी जिल्हा उपनिबंधक कार्यालय, नगर येथे धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती जिल्हा पतसंस्था स्थैर्यनिधी सहकारी संघाचे अध्यक्ष सुरेश वाबळे यांनी दिली.

राहुरी तालुक्‍यातील पतसंस्था पदाधिकारी व कर्मचारी यांना सदर आंदोलनाची माहिती देण्यासाठी प्रेरणा पतसंस्थेत झालेल्या बैठकीत सुरेश वाबळे बोलत होते. अध्यक्षस्थानी बजरंग तनपुरे होते.

अधिक माहिती देताना वाबळे म्हणाले की, या मागण्यांबाबत तालुकास्तरावर जिल्ह्यातील पतसंस्थांनी सहायक निबंधक कार्यालयांना यापूर्वीच निवेदने दिली आहेत. राहुरी तालुक्‍यातील सहकारी पतसंस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी देखील सहायक निबंधक कार्यालयात शिष्टमंडळाने जाऊन मागण्यांची 15 दिवसांत दखल न घेतल्यास 20 जुलै रोजी जिल्हा उपनिबंधक कार्यालय, नगर येथे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

या मागण्यांबाबत अद्यापि निर्णय न झाल्याने आंदोलन करण्यात येणार आहे. साई आदर्श मल्टिस्टेटचे अध्यक्ष शिवाजीराव कपाळे यांनी मार्गदर्शन करून आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. बैठकीस आदर्श पतसंस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब चोथे, राहुरी तालुका डॉक्‍टर केमिस्ट पतसंस्थेचे अध्यक्ष सोपान हारदे, राजमाता पतसंस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब येवले, प्रगती पतसंस्थेचे अध्यक्ष ऍड. विजय कडू, मियॉंसाहेब पतसंस्थेचे अध्यक्ष श्‍यामराव निमसे, उपाध्यक्ष साहेबराव जाधव, टाकळीमियॉं पतसंस्थेचे रोशन, नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष मुख्तार सय्यद, उपाध्यक्ष अनिलराव इंगळे, व्यापारी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रकाश पारख, अरुणोदय पतसंस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब उंडे, शिवअंकुर पतसंस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पवार, केशर पतसंस्थेचे अध्यक्ष सागर तनपुरे, आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सुरेश वाबळे म्हणाले की, सहकार चळवळीत पतसंस्थांचे मोठे योगदान आहे. ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था पतसंस्थांमुळे बळकट झालेली आहे. अलीकडील काळात कामकाज करताना संस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याची वरिष्ठ पातळीवर दखल घेऊन पतसंस्थांच्या मागण्यांची सोडवणूक होणे गरजेचे आहे. आमच्या मागण्यांची दखल न घेतली गेल्यास वेळप्रसंगी राज्यपातळीवरही आंदोलन करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)