पतसंस्थांतील एक लाखापर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण

एक ऑक्‍टोबरपासून अंमलबजावणी; स्थैर्य निधीचे कामकाजही सुरू राहणार

प्रभात वृत्तसेवा
नगर – महाराष्ट्रातील नागरी, ग्रामीण बिगर शेती, महिला व पगारदार सहकारी पतसंस्था तसेच मल्टीस्टेट पतसंस्थांतील एक लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना संरक्षण देणारी पंडित दीनदयाळ उपाध्याय पतसंस्था संरक्षण योजना राज्यात एक ऑक्‍टोबरपासून सुरू होत आहे. राज्य सरकारने या योजनेला मान्यता दिली आहे. त्यामुळे राज्यातील आठ हजार 421 पतसंस्थांच्या 40 हजार कोटी रुपयांच्या ठेवींना विमा संरक्षण मिळणार आहे.
नगर जिल्ह्यातील पतसंस्थांनी या प्रश्‍नावर मोठे आंदोलन केले होते. पूर्वी ठेव सुरक्षा महामंडळ स्थापन करण्यात आले होते; परंतु त्यातील गॅरंटी या शब्दावर “ईर्डा’कडे आक्षेप घेण्यात आला होता. ठेव सुरक्षा महामंडळ गुंडाळून ठेवावे लागले. पतसंस्थांमध्ये बुडालेल्या ठेवींमुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलन केले. त्यातून पतसंस्थांतील ठेवींना सुरक्षा देण्याचा मुद्दा चर्चेत आला. स्थैर्य निधीची कल्पना त्यातूनच पुढे आली. हे काम फक्त नगर जिल्ह्यात होत होते. त्यानंतर सहकार खात्याकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. आंदोलने करण्यात आली. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना हा प्रश्‍न समजावून सांगण्यात आला. 25 बैठकानंतर पंडित दीनदयाळ उपाध्याय पतसंस्था संरक्षण योजना हाती घेण्यात आली. महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ व महाराष्ट्र राज्य पतसंस्था महासंघ अशा दोन्ही संस्थांच्या संयुक्त प्रयत्नांतून पतसंस्थांच्या ठेवींना संरक्षण देण्याचे काम होणार आहे. पतसंस्था महासंघाच्या पाच जणांना या विमा कंपनीत प्रतिनिधीत्त्व देण्यात येणार आहे. स्थैर्य निधीचे काम व विमा संरक्षणाचे काम वेगवेगळे असल्याने स्थैर्य निधी बंद होणार नाही.
पंडित दीनदयाळ उपाध्याय पतसंस्था संरक्षण योजनेचा प्रारंभ 25 तारखेला लोणावळा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत होणार आहे. महाराष्ट्रन राज्य पतसंस्था महासंघाचे अध्यक्ष काका कोयटे, नगर जिल्हा सहकारी पतसंस्था स्थैर्यनिधी सहकारी
संघाचे अध्यक्ष सुरेश वाबळे व नगर जिल्हा स्थैर्यनिधी संघाचे उपाध्यक्ष वसंत लोढा, जिल्हा उपनिंबधक दिग्विजय आहेर, शिवाजी कपाळे, यांनी ही माहिती दिली. दीनदयाळ उपाध्याय यांची 102 वी जयंती असल्याने दीनदयाळ सहकारी पतसंस्था तरलता आधारित ठेव संरक्षण योजना असे नाव या योजनेस देण्यात आलेले आहे. नगर जिल्हा सहकारी पतसंस्था स्थैर्यनिधीच्या कामाचा गौरव या निमित्ताने होत आहे. या योजनेत महाराष्ट्रातील प्राथमिक पातळीवर अ आणि ब वर्गातल्या पतसंस्थांच्या ठेवींना संरक्षण दण्यात येणार आहे. पतसंस्थांच्या ठेवीच्या 0.01 टक्के इतकी रक्कम विम्याचा हप्ता म्हणून द्यावी लागेल. नागरी बॅंकांसाठी असलेल्या डीआयसीजीसी व पंडित दीनदयाळ उपाध्याय तरलता संरक्षण योजनेतील फरक कोयटे यांनी समजावून सांगितला. कर्जबाजारी संस्थांची कर्जे विकत घेऊन ती वसूल करण्याचे काम यापुढेही स्थैर्य निधीच्या माध्यमातून सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आकडे बोलतात
राज्यातील पतसंस्था- 13,990
विम्याचे संरक्षण मिळणाऱ्या संस्था-8421
यापूर्वी स्थैर्य निधीचा फायदा मिळालेल्या संस्था-13
विमा संरक्षण मिळू शकणाऱ्या नगर जिल्ह्यातील संस्था-619

दोनशे कोटींचे भागभांडवल
पतसंस्थांच्या माध्यमातून या ठेव संरक्षण योजनेसाठी शंभर कोटी रुपयांचे भाग-भांडवल उपलब्ध होईल. महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ शंभर कोटी रुपये घालील. अशा दोनशे कोटी रुपयांच्या भाग-भांडवलातून ही संस्था उभी राहील, असे कोयटे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
16 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)