‘पतंग’ प्रकल्पाने लावली गणिताची गोडी

महापालिका शाळांमध्ये उपक्रम : सेव्ह द चिल्ड्रन इंडिया संस्थेचा पुढाकार

पिंपरी – भाषा व गणित विषयाची गोडी नसणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण तसेच बालवाड्या शिक्षकांना खास प्रशिक्षण देण्याचे काम “पतंग’ उपक्रमाच्या माध्यमातून गेली तीन वर्ष सुरु आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांसाठी सेव्ह द चिल्ड्रन इंडिया ही संस्था विनामोबदला हा उपक्रम राबवत असून त्यामुळे गुणवत्ता वाढीला हातभार लागत असून विद्यार्थ्यांमध्ये गणित व भाषेची गोडी निर्माण झाली आहे.

महापालिकेच्या जवळपास 40 शाळांमध्ये हा पथदर्शी प्रकल्प राबविला जात आहे. इयत्ता दुसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना त्यात सामावून घेण्यात आले आहे. गुणवत्तेत कमी असणारे विद्यार्थी शोधून त्यांच्यासाठी वेगवेगळ्या स्तरांतील विषयाची गोडी निर्माण करण्याचे प्रयत्न या प्रकल्पाच्या माध्यमातून केले जात आहे. विद्यार्थ्यांचे 15-15चे गट करून त्यांच्या अभ्यासामधील अडचणी समजून घेण्याचे काम ही संस्था करीत आहे. महापालिकेच्या शिक्षक व मुख्याध्यापकांनी देखील “पतंग’ उपक्रमाचे कौतुक केले आहे. या प्रकल्पासाठी वेगळ्या शिक्षक वर्गाची नेमणूक केलेली आहे. ज्या शाळेत हा उपक्रम घेतला जात आहे, त्याच शाळेत वेगळी वर्गखोली निर्माण करून हे तास घेतले जातात. शाळेच्याच वेळेत मुलांकडून दीड तास विविध अभ्यासक्रमांवर आधारित विषयांचा सराव करून घेतला जातो.

पिंपरीमध्ये सेव्ह द चिल्ड्रन इंडिया या संस्थेतील सात ते आठ शिक्षक मुलांना अध्यापनाचे काम सध्या करत आहेत. या उपक्रमाअंतर्गत शिक्षक व मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर आधारित बैठक घेऊन उपयुक्त अभ्यासक्रम बनविला आहे. तसेच विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन यादरम्यान केले जाते. विद्यार्थ्यांसाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात. यासाठी पालक व शिक्षकांना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त प्रकारची नियमावली तयार केली आहे. शाळांच्या शिक्षकांबरोबर विविध कलाकृतींचे संचालन केले जात आहे. बालवाडीच्या शिक्षकांसाठी प्रशिक्षणाची दर्जेदार नियमावली तयार केली आहे. मुलांसाठी गणित व विज्ञान मेळाव्याचे आयोजन केले जात आहे. एकूणच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव अशा उपक्रमांमधून मिळत असल्याचे प्रशासन अधिकारी बी. एस. आवारी यांनी सांगितले.

असा आहे “पतंग’ प्रकल्प
भाषा व गणित विषयात कमी गुणवत्ता असणारे विद्यार्थी शोधणे व त्यांच्यासाठी विशेष उपक्रम राबविणे. बालवाडी शिक्षकांना प्रशिक्षण देणे तसेच विद्यार्थ्यांमधील क्षमता विकसित करणे हा मुख्य हेतू या पतंग उपक्रमाचा आहे. विद्यार्थ्यांच्या उपजत कलागुणांना वाव मिळेल अशा विद्यार्थ्यांच्याच आवडीचे उपक्रम यामाध्यमातून राबविले जात आहेत. विद्यार्थी देखील हसत खेळत या उपक्रमाचा आनंद घेतात. याकरिता शिक्षक व मुख्याध्यापकही या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यास मदत करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)