पतंगाच्या मांजा पुन्हा जीवावर उठला

दुचाकीस्वार डॉक्‍टर तरुणीचा मृत्यू
कासारवाडी परिसरातील प्रकाराने प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर

पिंपरी-  पतंगाचा मांजा गळ्याला अडकल्याने दुचाकीवरून जात असलेल्या डॉक्‍टर तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.7) सायंकाळी सातच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर नाशिक फाटा येथे घडली. डॉ. कृपाली निकम (वय- 26, रा. पिंपळे सौदागर) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. कृपाली आज सायंकाळी पुण्याहून भोसरीकडे दुचाकीवरून येत होत्या. त्या नाशिक फाटा येथील भारतरत्न जे.आर.डी. टाटा उड्डाणपुलावरून जात होत्या. गळ्याला पतंगाचा मांजा अडकला. दुचाकीचा वेग जास्त असल्याने या मांजामुळे त्यांचा गळा कापला गेला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच पुणे शहरातील शिवाजी पूल परिसरात अशाच घटनेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला होता. त्यावेळी पोलीस आणि पालिका प्रशासनाने झाडाझडती घेत काही दुकानांतून चिनी मांजा जप्ती मोहीम सुरू केली होती. मात्र, काही दिवसांतच ही मोहीम गुंडाळण्यात आली. आता पुन्हा एका तरुणीचा बळी गेल्याने सुस्तावलेले प्रशासन कारवाई करणार का, असा प्रश्‍न या घटनेनंतर उपस्थित होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)