पतंगराव कदम यांच्या जाण्याने भरून न येणारी पोकळी

श्रद्धांजली सभेत विविध क्षेत्रांतील नागरिकांच्या भावना

पुणे – पुण्यातील शिक्षण क्षेत्राला वेगळी दिशा देणारे पतंगराव कदम हे एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्याकडे आम्ही दीपस्तंभासारखे पाहिले आहे. सामान्य माणसाची बांधिलकी जपणारा माणूस हे त्यांच्या जीवनाचे वैशिष्ट होते. हरहुन्नरी आणि सकारात्मक उर्जा असणारा नेता आज आपल्यात नाही ही पोकळी कधीही न भरुन येणारी आहे, अशा शब्दांत भारती विद्यापीठाचे संस्थापक पतंगराव कदम यांना शिक्षण, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी श्रद्धांजली अर्पण केली.

समस्त पुणेकर नागरिक, कदम कुटूंबीय आणि भारती विद्यापीठ परिवार यांच्यावतीने पतंगराव कदम यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गुरूवारी शोकसभा आयोजित करण्यात आली होती. याला शोकसभेला शैक्षणिक, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेकजण उपस्थित होते. त्यात माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, पालकमंत्री गिरीश बापट, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, खासदार संजय काकडे, खासदार राजीव सातव, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कॉंग्रेस नेते हर्षवर्धन पाटील, सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब मुजूमदार, एमआयटीचे संस्थापक विश्‍वनाथ कराड, ज्येष्ठ सामाजिक नेते बाबा आढाव तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पतंगराव कदम यांना श्रद्धांजली अर्पण केली.

पतंगराव कदम यांच्यात नेतृत्वगुण होते. शिक्षण क्षेत्र आणि राजकारणातून त्यांनी समाजकारण केले. त्यांनी शिक्षण, राजकारण आणि समाजकारण यांचा एक छानसा त्रिकोण निर्माण केला, असे सिम्बायोसिसचे संस्थापक शां. ब. मुजूमदार यांनी सांगितले. तर शिक्षणक्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे पंतगराव कदम. त्यांच्यातील माणूसपण मोठे होते, असे बाबा आढाव यांनी सांगितले. रयत शिक्षण संस्थेचा बापमाणूस गेला, अशा शब्दांत रयतचे अध्यक्ष अनिल पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

पतंगराव कदम यांच्या कार्याचा आढावा दर्शविणारी एक चित्रफितसुद्धा यावेळी दाखविण्यात आली. नागरिकांची गर्दी लक्षात घेऊन बालगंधर्व रंगमंदिराबाहेर स्क्रिन लावण्यात आले होते.

आज आपण एका अनपेक्षित प्रसंगाच्या निमित्ताने भेटत आहोत, पतंगराव कदम यांच्या श्रध्दांजली सभेसाठी यावे लागेल, असे वाटले नव्हते असे सांगत प्रतिभा पाटील म्हणाल्या, कदम म्हणजे आनंद, उत्साह आणि कर्तव्यसंपन्न असे व्यक्तिमत्व होते. भारती विद्यापीठासारखे एक मोठे विश्‍व निर्माण करुन ही त्यांच्यात अहंकाराचा लवलेश नव्हता. सहानभुतीने त्यांनी लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले.
– प्रतिभा पाटील, माजी राष्ट्रपती


सामान्य माणसाबरोबर असणारी सामाजिक बांधलकी हे त्याच्या जीवनाचे वैशिष्ट्ये होते. अखेरच्या श्‍वासापर्यत ते कष्ट करत राहिले. शिक्षणात गुणवत्तेबरोबर स्वत:च्या पायावर उभे राहण्याची ताकद विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली पाहिजे, याच उद्देशाने त्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमाचा पाया रचला. ती त्यांची दूरदृष्टी होती, अशा शब्दांत शरद पवार यांनी भावना व्यक्त केल्या.
– शरद पवार, माजी केंद्रीय कृषिमंत्री


एक जिंदादिल व्यक्तिमत्व आपल्यातून हरवले आहे. माझा आणि पतंगराव कदम यांचा 42 वर्षाचा संबंध होता. कामाला वाहून घेतलेले सतत हसतमुख असणारे ते व्यक्ती होते.
– प्रकाश जावडेकर, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री


मी पतंगराव कदम यांना कधी नाराज पाहिले नाही. ते सतत उत्साही असत. त्यांचे व्यक्तिमत्व आगळेवेगळे होते. शिक्षण क्षेत्रात तर त्यांनी इतिहास घडविला.
– गिरीश बापट, पालकंमत्री, पुणे


पतंगराव कदम हे मला नेहमी मोठ्या भावासारखे होते. महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून मी आलो, त्यावेळी त्यांनी मला मोलाचे सहकार्य केले. खरे तर त्यावेळी त्यांचे नाव चर्चेत होते. पण, माझी निवड झाली तरी सुद्धा मनात किंतू परंतू न ठेवता त्यांनी मला मदत केली. भारती विद्यापीठ हे देशातील सर्वोत्तम विद्यापीठ होईल, यासाठी यापुढील काळात आपण प्रयत्न केले पाहिजेत, हीच त्यांना खऱ्या अर्थाने श्रध्दांजली ठरेल.
– पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री

याशिवाय खासदार राजीव सातव, हर्षवर्धन पाटील, विश्‍वनाथ कराड, किर्लोस्कर उद्योग समुहाचे संजय किर्लोस्कर, ज्येष्ठ कॉंग्रेस नेते उल्हास पवार, भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजीत यशवंतराव मोहिते, मॉर्डन एज्यूकेशन संस्थेचे डॉ. गजानन एकबोटे, ज्येष्ठ वकील एस.के.जैन, संचेती हॉस्पिटलचे के.एच.संचेती, कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे वालचंद संचेती, ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ पी.ए. इनमादार, सिंधूताई सपकाळ, प्रवीण तरडे, रमेश बागवे, दीपक मानकर यांनी सुद्धा श्रद्धांजली अर्पण केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)