पणदरे खिंड परिसर तळीरांमाचा अड्डा

  • वनविभागाचे दुर्लक्ष : बाटल्यांच्या फुटलेल्या काचांचा वन्यप्राण्यांना धोका

सोमेश्‍वनगर – नीरा-बारामती रस्त्यावर पणदरे जवळील पणदरे खिंड परिसर तळीरामांसाठी दारूचा अड्डा बनला असून दररोज या परिसरात मद्यपीच्या ओल्या पार्ट्या होत आहेत. वन विभाग मात्र, जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.
नीरा-बारामती हा राज्य महामार्ग असून लवकरच या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग होणार आहे. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच मोठी वर्दळ असते. कोऱ्हाळे बुद्रुक ते पणदरे दरम्यान पणदरेखिंड नावाचा निर्जन परिसर आहे. या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर विस्तीर्ण वनक्षेत्र आहे. वनक्षेत्रात चिंकारा जातीची हरणे, ससे, लांडगे मोठ्या संख्येने आहेत. मात्र, या ठिकाणी वनविभागाचे कर्मचारी कधीच गस्त घालताना दिसत नाहीत. नेमका याचाच फायदा तळीराम घेताना दिसत आहेत. दररोज सायंकाळी सातनंतर या ठिकाणी मद्यपी लोकांचा अड्डाच भरलेला असतो. तळीरामांची टोळकी या ठिकाणी खुलेआम दारू पीत असतात. अनेकदा त्यांच्यातच वाद होत असतात. याचा फटका प्रवाशांना बसत असतो. शिवाय हे मद्यपी वनक्षेत्राच्या खूप आतपर्यंत दारू पिण्यासाठी जातात. मद्यपी अनेकदा दारूच्या बाटल्या रिचवून रिकाम्या बाटल्या त्याच ठिकाणी टाकत असतात. त्यामुळे वनक्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणावर कचरा जमा झाला आहे. शिवाय दारूच्या बाटल्यांच्या फुटलेल्या काचांमुळे वन्यप्राण्यांना इजा होण्याची शक्‍यता आहे. हे मद्यपी दारूच्या नशेत वृक्षांची ही मोडतोड करत असतात.
मद्यपी राजरोसपणे दारूच्या पार्ट्या करत असताना वनविभाग मात्र, मूग गिळून गप्प बसून असल्याचे चित्र आहे. वास्तविक या ठिकाणच्या वन कर्मचाऱ्यांनी गस्त घालणे अपेक्षित आहे. मात्र, वन विभागाचे कर्मचारी रात्री इकडे फिरकतच नाहीत. त्यांच्या कामचुकारपणामुळे वनविभागाचे मोठे नुकसान होत असून या तळीरामांचा बंदोबस्त करण्याची मागणी वन्यप्रेमी करीत आहेत.

वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना याबाबत तात्काळ सूचना देण्यात येणार असून दररोज रात्री गस्त घालण्यात येणार आहे. वनक्षेत्रात मद्यपी आढळल्यास तसेच वन कायद्याचा भंग करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. – सुधाकर फरांदे, वनपरिक्षेत्र अधिकारी, बारामती तालुका


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)