सार्वजनिक बांधकाम व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ढकलताहेत एकमेकांवर जबाबदारी

लोणंद – आठवड्यांपूर्वी ट्रकच्या धडकेत पडझड झालेला पाडेगाव टोलनाका उचलण्यास कोणीच तयार नसल्याने वाहनचालकांची चांगलीच पंचाईत झाली आहे. टोलनाक्‍याचा पडलेला भाग रात्री दिसत नसल्याने पुन्हा अपघातचा धोका आहे.

1 जुलै 2014 रोजी महाराष्ट्रातील 44 टोलनाके बंद करण्यात आले. त्यापैकी एक असलेला पाडेगावचा टोलनाका गेल्या आठवड्यात ट्रकने धडक दिल्याने मोडकळीस आलेला आहे. यासंदर्भात सातारा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याने सामान्य वाहनचालकांना मात्र नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांनी हा रस्ता सध्या आमच्या ताब्यात नसून दीड वर्षांपूर्वीच राष्ट्रीय महामार्गकडे हस्तांतरित केलेला असल्याने याच्या देखभालीची जबाबदारी आमच्याकडे नसल्याचे स्पष्ट करून जबाबदारी झटकून टाकली. तर राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी सांगत आहेत की रस्त्याची जबाबदारी आमच्याकडे आहे. परंतु, टोलनाका आमच्याकडे नाही. हा रस्ता हस्तांतरित करण्यापूर्वी टोलनाका बंद करताना टोलवसूल करणाऱ्या खाजगी विकसकाकडून सातारा बांधकाम विभागाकडे सुपूर्द करण्यात आलेला. त्यामुळे त्याची जबाबदारी आमच्याकडे नाही.

या दोघांच्या वादात वाहनचालक त्रस्त झाले आहेत. रात्रीच्या वेळी हा तुटलेला भाग लवकर लक्षात येत नसल्याने येथे पुन्हा अपघात होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

 विजयराव धायगुडे, उपसरपंच, पाडेगाव
राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी आणि सातारा बांधकाम विभाग यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करण्यात येऊनही कोणीच दाद देत नाही. याचा त्रास स्थानिक म्हणून आम्हाला आणि इतरही वाहनचालकांना होतोय. याप्रकरणी त्यांनी एकमेकांशी समन्वय साधून लवकरात लवकर तोडगा काढावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)