पठार भागात नुकसानीचे पंचनामे करा

संगमनेर – तालुक्‍यातील पठार भागातील सर्वच गावांना मृग नक्षत्राच्या मुसळधार पावसाने झोडपले. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक ठिकाणचे नुकसान झाले असून, अकलापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची भिंत पडली आहे. तर, येठेवाडी येथील शाळेचे पत्रे उडून गेले आहेत. या ठिकाणी झालेल्या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करण्यात यावे, अशी मागणी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती अजय फटांगरे यांनी केली आहे.

मान्सूनपूर्व पावसाने वेळेत हजेरी लावल्याने काही ठिकाणी ओढ्यानाल्यांना, बंधाऱ्यांमध्ये पाणी साचले आहे. यामुळे पठार भागातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. रविवारी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान अकलापूर, घारगाव, साकूर, नांदूर, खंदरमाळ, बोटा, आदी भागांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. दोन तास चाललेल्या वादळी पावसाचा पठार भागात चांगलाच फटका बसला आहे. घटनेची माहिती समजताच जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती अजय फटांगरे यांनी पठार भागातील अकलापूर, येठेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट दिली. तत्काळ पंचनामे करण्यास सांगितले आहे. सोमवारी (दि.19) सकाळी गटशिक्षण अधिकारी के. के. पवार यांनीही घटनास्थळी भेट देऊन शाळेची पाहणी केली. तद्‌नंतर मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याशी चर्चा केली. तत्काळ प्रस्ताव सादर करून निधी उपलब्ध होणार असल्याचे फटांगरे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)