पटसंख्येत महापालिका “फर्स्ट क्‍लास’

प्रशांत घाडगे

पिंपरी – “स्मार्ट सिटी’च्या दिशेने वाटचाल करणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळा “हायटेक’ होत आहे. त्याचा सकारात्मक परिणाम विद्यार्थी पटसंख्येवर दिसू लागला आहे. महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवित असून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण दिले जात आहे. यामुळे, महापालिका शाळांची गुणवत्ता वाढत असल्याने मागील वर्षीपेक्षा यंदा महापालिका शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या अकराशेने वाढली आहे. या शाळांमध्ये शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा वाढता कौल पाहता या शाळा सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण ठरत आहेत.

-Ads-

पिंपरी-चिंचवड महापालिका शाळेत शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न होत नसल्याने सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या घटत असल्याची ओरड सगळीकडे केली जात होती. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांची गुणवत्ता निश्‍चितपणे कौतुकास्पद आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांवर शालेय जीवनात सामाजिक, शैक्षणिक व संस्काराचे धडे दिले जात आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजना राबविल्या जात आहेत. तसेच, महापालिका शाळांमध्ये कराटे, योगा यासारखे स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले जाते. शहरातील खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ज्या पध्दतीने शिक्षण दिले जाते त्याहून अधिक चांगले गुणवत्तापूरक शिक्षण महापालिका शाळेत मिळत आहे. तसेच, शाळा सुरु होण्यापूर्वी महापालिकेतर्फे शालाबाह्य विद्यार्थ्यांचा सर्व्हे करुन अशा विद्यार्थ्यांना शाळेमध्ये प्रवेश दिला जातो.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 105 शाळा असून यामधील दोन शाळा आयएसओ मानांकनप्राप्त आहेत. तसेच, बहुतांशी शाळेत डिजीटल पध्दतीने शिक्षण दिले जात आहे. याचबरोबर, शाळेमध्ये वाचनालय, कचऱ्यावर विघटन करुन खत प्रकल्प, औषधी वनस्पती प्रकल्प, संगणक कक्ष, चित्ररुपी अभ्यास, वैज्ञानिक प्रयोगशाळा यासारखे विविध प्रकल्प राबविले जात आहेत. यामुळे, विद्यार्थ्यांना शालेय वयातच अवांतर वाचनाची सवय लागून विविधांगी विषय जाणून घेण्याची व अभ्यासाची गोडी लागते. यासाठी, महापालिकेचा शिक्षण विभागही कसोसीने प्रयत्न करताना दिसत आहे. तसेच, महापालिका शाळांमधून बाहेर पडणारे कित्येक विद्यार्थी उच्चपदावर पोहचले आहेत. काही वर्षापूर्वी खासगी शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओढा दिसत होता. मात्र, महापालिका शाळांची गुणवत्ता वाढ होत असल्याने या शाळांकडे विद्यार्थी आकर्षित होत आहेत. महापालिका शाळेमध्ये यंदा वाढलेली पटसंख्या अशीच ठेवण्याचे आवाहन महापालिकेपुढे येत्या काळात असणार आहे.

महापालिका शाळांची पटसंख्या
– 2016-17 : 36552
– 2017-18 : 36728
– 2018-19 : 37851 (ऑगस्ट महिनाअखेर)

महापालिका शाळांची संख्या
मराठी माध्यम – 87
इंग्रजी माध्यम – 7
हिंदी माध्यम – 3
उर्दू माध्यम – 14

पट संख्या वाढीची कारणे
– शालाबाह्य मुलांना मोफत शिक्षण
– केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ
– डिजीटल माध्यमातून शिक्षण
– मोफत शालेय साहित्य वाटप
– मोफत बस पास योजना
– शैक्षणिक गुणवत्तावाढ उपक्रम

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)