पक्ष्यांच्या जीवावर बेतणारा संक्रांतीचा पतंगोत्सव!

नायलॉन मांजा टाळण्याचे आवाहन : महिन्याभरात सहा दुर्मिळ पक्षी गंभीर जखमी

नगर – कटूता दूर करणारा, नात्यांची ऊब जपणारा सण म्हणजे संक्रांत! या सणाचा उत्साह नगर शहरासह जिल्ह्यातील युवक-युवती, तरुण-तरुणी आणि लहानगे जीवावर बेतून पंतगोत्सव साजरा करतात. परंतु पतंगासाठी वापरला जाणारा मांजा हा निसर्ग आणि त्याच्या कुशीत खेळणाऱ्या पक्षांच्या जीवावर बेतू लागला आहे. गेल्या दहावर्षांपासून हे प्रमाण वाढले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पिलांसाठी अन्नाच्या शोधात बाहेर पडणारे पक्षी, संक्रांतीच्या काळात मात्र जीव मुठीत घेऊन बाहेर पडतात. मांजामध्ये अडकल्यावर काही जखमी होतात, तर काही प्राण गमवतात. परिणामी घरट्यातील पिल्लेही दगवतात. ही निसर्गाची हानी संक्रांतीतील पतंगोत्सवामुळे होते. ती भरून निघणारी नाही. ती रोखता येऊ शकते. त्यासाठी पक्षीमित्र संघटनांनी निसर्गावर प्रेम करत निसर्गाचा समतोलासाठी नायलॉन आणि त्यासारखा मांजाचा वापर पतंग उडविताना करू नये, असे आवाहन केले आहे.

अहमदनगर जिल्हा निसर्गप्रेमी संघटना व नगरचे निसर्गमिञ मंडळाने यासाठी पुढाकार घेतला आहे. संक्रांतीच्या काळापासून पुढील महिनाभर जखमी पक्षांना उपचार करता यावे आणि मांजाविरहित पतंग उडविण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी हेल्पलाईन सुरू केली आहे. जखमी पक्षांच्या तात्काळ उपचार मिळावेत यासाठी 8788219973 अथवा 9604074796 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संघटनेने केले आहे. पक्षीअभ्यासक जयराम सातपुते, शिवकुमार वाघुंबरे, नवीन दळवी, संदीप राठोड, राजेश काळे, भैरवनाथ वाकळे, रूषीकेश लांडे, बाळासाहेब डोंगरे, सुधीर दरेकर, सचिन चव्हाण, लक्ष्मण साखरे, प्रमोद अळकुटे, डॉ. सुधाकर गीते आदी पक्षीमित्र नगर जिल्ह्यात 2010 साला पासून दरवर्षी जखमी पक्षांसाठी बर्ड हेल्पलाईन राबवित आहेत.

जखमी पक्षांवर मान्यताप्राप्त खाजगी संस्थेत किंवा सरकारी पशुवैद्यकिय दवाखान्यांमध्ये उपचार करून पुन्हा निसर्गात मुक्त केले जाते. महिनाभरात सहा पक्षांवर उपचार करून निसर्गात मुक्त केल्याची माहिती सातपुते यांनी दिली. नायलॉन मांजाचा गेल्या पाच ते सहा वर्षांपासून उपद्रव वाढला आहे. निसर्गावर घाला घालणारा हा मांजा माणसांच्या जीवावर देखील बेतू लागला आहे. त्यामुळे नायलॉन मांजाचा वापर काहीसा कमी झाला आहे. तरी देखील त्याची छुप्यापद्धतीने विक्री होत असल्याचे आढळून येत आहे. कॅटोन्मेंट आणि महापालिका प्रशासनाने नायलॉन मांजाच्या विक्रीवर बंदी घातली आहे. आरोग्य विभागामार्फत कारवाई देखील केली जाते. परंतु ही कारवाई जरब निर्माण करणारी नसल्याने नायलॉन मांजाची आजही सर्रासपणे विक्री सुरू आहे.

या मांजामुळे गंभीररित्या जखमी होऊन मृत्यू झालेल्या पक्षांचे प्रमाण जास्त आहे. ते दिवसांगणित वाढत आहे. संक्रातीच्या काळात हे प्रमाण अधिक होते. यामुळे निसर्गाचा, विशेष करून शहरातील पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. ते रोखण्यासाठी निसर्गावर आणि त्यातील जीवसृष्टीवर प्रेम करण्याचे आणि संवर्धनाचे आवाहन नगरच्या पक्षीप्रेमी आणि निसर्ग मित्र मंडळाने केले आहे.

भुईकोट किल्ला येथे रविवारी उपक्रम
निसर्गमिञ मंडळाने पक्षीप्रेमींना पक्षीगणना व पक्षीनिरीक्षणाची शास्त्रशुद्धा माहिती मिळावी यासाठी भुईकोट किल्ला येथे रविवारी (ता. 20) येथे सकाळी सात ते नऊपर्यंत कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पक्षी अभ्यासक डॉ. सुधाकर कुऱ्हाडे व कार्तिकस्वामी मुळे हे मार्गदर्शन करणार आहेत. या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जयराम सातपुते यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)