पक्ष्यांची घरटी आणि आपण

प्राची पाठक

आपल्या मनात एक कल्पना असते पक्ष्यांविषयी. रोज दमून भागून, दिवसभर अन्न शोधून पक्ष्यांची शाळा संपली की ते संध्याकाळी आपापल्या घरट्याकडे परततात. परंतु, असे काही पक्ष्यांच्या जगात नसते. पक्षी रोज आपल्यासारखे दिवसभर बाहेर काम करून रात्री घरट्यात जाऊन झोपले, असे दिसत नाही. फारतर, ते दिवसअखेर आपापल्या झाडावर, फांदीवर, कोनाड्यात जाऊन बसले, असे म्हणता येईल. पक्षी घरटी केवळ विणीच्या हंगामात बांधायला घेतात आणि फक्त पिल्लांचे संगोपन व्यवस्थित करणे, ह्याचसाठी त्यांना सुरक्षित घरटे हवे असते. एरवी मात्र त्यांना घरटे लागत नाही! भावी पिढीच्या उत्तम संगोपनासाठी घरटे बांधायची लगबग करणे, नव्या जीवांना सोयीचे असे उबदार घरटे बांधणे हे किती छान आहे. असे लहान मुलांना सोयीचे असे माणसाचे घर असावे, ही पद्धत आता कुठे काही मानवी घरांच्या रचनेत दिसायला लागली आहे. नाहीतर, माणसाच्या घरांमध्ये लहान मुलांच्या संगोपनासाठी एक घर, असा फारसा विचार केलेला आढळत नाही.

एक छान झाड असते आणि त्यावर आडोश्‍याला घरटे बांधलेले असते, असेही पक्ष्यांच्या जगात नेमके नसते. जितकी पक्ष्यांमध्ये विविधता जास्त, तितक्‍या त्यांच्या घरटे बांधायच्या रचना जास्त. काही पक्षी जमिनीवर खड्डा करून तिथे अंडी घालतात. तर काही झाडाच्या खोडात भोक पाडून त्यात अंडी घालतात. झाडाच्या मोठाल्या पानांनाच गोल -गोल फिरवून त्यात उबदार रचना करून त्यातही अंडी घालणारे अनेक पक्षी आहेत. काही पक्षी घरटे झाडाला टांगतात, तर काही फांदीच्या आधाराने कपासारखे खळगे करून तसे घरटे बांधतात.

पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटी बनवितांना कोणत्या पक्ष्यांसाठी आपल्याला ते हवे आहे, हे आधी ठरवावे लागते. विकतची रंगीबेरंगी घरटी आणण्यापेक्षा अगदी साध्याश्‍या खोक्‍याची, पुठ्ठ्याची, मडक्‍याची, तेलाच्या डब्याची आणि पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटलीची देखील घरटी आपली आपल्यालाच सहजी बनविता येतील.

वर्षभरात अगदी केंव्हाही अशी घरटी बनवून तुम्ही घरात अथवा घराबाहेर योग्य जागी, योग्य प्रकारे लावलीत, तर त्यात पक्षी नक्कीच येणार! लवकरच त्यांच्या चिमुकल्यांचा आवाज देखील तुमच्या कानी पडणार. आहे ना गम्मत! चला तर मग, असे एक तरी कृत्रिम घरटे बनवून बघू या. त्यांना जागा द्यायची, फारतर पाणी द्यायचे. बाकीचे सगळे ते जमा करतील. आपण त्यांच्या प्रायव्हसीचे सुद्धा भान ठेवायचे. उगाच क्‍लिकक्‍लिकाट करायला जायचे नाही. डोळ्यांमध्ये त्यांना शूट करायचे, मजा घ्यायची!


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)