पक्षबांधणीसाठी राज ठाकरे पुणे मुक्‍कामी

पुणे – शहर पदाधिकारी नियुक्ती तसेच पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांच्या पुणे मुक्कामी आले आहेत. दरम्यान, मंगळवारपासून पक्षाच्या शहर पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती पक्षाच्या नारायणपेठ येथील कार्यालयात सुरू करण्यात आल्या आहेत.

मनसेचे राज्याचे चार प्रमुख पदाधिकारी आणि शहरातील तीन पदाधिकारी या मुलाखती घेत असून त्यांच्या मुलाखतीनंतर अंतिम निवडींवर पक्षाध्यक्ष ठाकरे शिक्कामोर्तब करणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, मंगळवारी राज ठाकरे यांच्या समवेत आलेल्या अमित ठाकरे यांनी या पदाधिकाऱ्यांची नारायण पेठ कार्यालयास भेट दिली. तसेच या मुलाखतींसाठी आलेल्या उमेदवारांशी चर्चा करून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सूचनाही केल्या असून त्याबाबत अधिक तपशील मिळू शकला नाही.

महापालिका निवडणुकीत मनसेला पराभवाचा मोठा धक्का सहन करावा लागला आहे. नगरसेवकांची संख्या 27 वरून थेट 2 वर पोहचली आहे. त्यामुळे ठाकरे यांनी या पूर्वीच शहरातील कार्यकारीणी अधिक सक्षम करून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी निर्णायक बदल करण्याचे सुतोवाच दिले होते. त्यानंतर काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्‍त्या केल्या असल्या तरी, अजून शहर कार्यकारीणीच्या नियुक्‍त्या झालेल्या नाहीत. या नियुक्‍त्यांसाठी आज पासून मुलाखती घेण्यात येत आहेत. पक्षाचे राज्य कार्यकारणीची नेते अनिल शिदोरे, शिरीश सावंत, संदीप देशपांडे आणि प्रमोद पाटील यांच्यासह गणेश सातपुते, रणजित शिरोळे आणि बाळासाहेब शेडगे हे मुलाखती घेत आहेत.

आज पदाधिकाऱ्यांची बैठक
पक्षाकडून ठाकरे यांचा हा दोन दिवसीय दौरा कोणताही गाजावाजा न करता ठेवण्यात आला आहे. अमित ठाकरे हे नारायण पेठ येथील कार्यालयात येऊन गेल्याची माहिती प्रसिध्दी माध्यमांनाही नव्हती. रात्री उशीरा ही माहिती प्रसिध्दी माध्यमांना मिळाली. त्यानंतर शहर पदाधिकाऱ्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याकडूनही या मुलाखती तसेच ठाकरे यांच्या कार्यक्रम तसेच दौऱ्याबाबत माहिती देण्यास समर्थता दर्शविण्यात आली.मात्र, मुलाखती घेण्याचा अधिकार आम्हाला देण्यात आला असून त्यानंतर ज्या सदस्यांची नावे निश्‍चित केली जातील त्यांना पदे देण्याचा अंतिम निर्णय स्वत: ठाकरे घेणार असल्याचे एका पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले. दरम्यान, आज ( बुधवारी) राज ठाकरे हे शहर पदाधिकाऱ्यांची त्यांच्या निवासस्थानी बैठक घेणार असल्याची माहितीही सुत्रांकडून देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)