पक्षपाती वैद्यकीय संशोधनापासून राहावे सावध (भाग दोन)

सध्या, अधिक काळ आनंदी आणि आरोग्यदायी जीवन कसे जगता येईल हे प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे. एखाद्या प्रयोगशाळेतील पांढरा कोट घातलेली व्यक्ती काही चुकीचे देखील म्हटली तरी लोक त्यावर लगेच विश्‍वास ठेवतात.
आरोग्य सुधारण्यासाठी, नवीन नियमांचे पालन करायला जगभरातील काही लोकांना आवडते; परंतु हे नवीन नियम कोणी बनवले व कोणाच्या सांगण्यावरून, या दोन मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले जात नाही.

1960च्या दशकापासून काही कंपन्या अशा पक्षपाती संशोधनाचा उपयोग आपल्या उत्पादनांचा खप वाढवायला करत आले आहेत. परंतु 2015 मध्ये जगभरातील अनेक संशोधकांनी आणि वर्तमानपत्रांनी प्रथमच मोठ्या प्रमाणात काही बहुराष्ट्रीय कंपन्या करत असलेल्या या लबाडी विरोधात आवाज उठवला. न्यूयॉर्क विद्यापीठाचे पोषण तज्ज्ञ, प्रोफेसर मेरीऑन नेस्ले यांनी 2015 साली 100 पेक्षा अधिक बनावटी वैद्यकीय संशोधनाचा वापर करणाऱ्या कंपन्याचे पितळ उघडे केले. वैद्यकीय संशोधनाचे प्रायोजक आणि त्यांच्या अनुदानीत अभ्यासातून प्राप्त झालेल्या परिणामांमुळे प्रयोजकांच्या व्यवसायाला होणारा फायदा हा मेरीऑन नेस्ले यांनी अनेक प्रकरणांमध्ये उघडकीस आणला.

-Ads-

भारतामध्ये देखील आरोग्यविषयक अहवालाच्या आडोश्‍यात काही कंपन्या स्वतःच्या उत्पादनांचे विपणन करतात. अमक्‍या प्रॉडक्‍टने तुमच्या तब्येतीवर तमका चांगला परिणाम होतो, असे सांगणारे पोस्टर शॉपिंग मॉल्समध्ये आरामात दिसून येतात. सोशल मीडिया तर अशा लेखांनी भरलेला आहे. अशा अविश्‍वसनीय जाहिराती किंवा पोस्टर्सवर ग्राहक काय कारवाई करू शकतात हे समजून घेण्यासाठी आम्ही तज्ज्ञांशी संवाद साधला. भारतामध्ये, एखाद्या कंपनीने जाहिरातीचा भाग म्हणून वृत्तपत्र, मॅगेझिन, सोशल मीडिया, होर्डिंग, पॅकेजिंग साहित्य, किंवा प्रचारात्मक सामग्रीवर खोटे, बनावट दावे प्रकाशित केले असल्यास ग्राहक त्याची तक्रार ऍडव्हर्टायझिंग स्टॅंडर्डस्‌ कौन्सिल ऑफ इंडियाच्या (ए-एस-सी-आय) वेबसाइटवर करू शकतात.

ए-एस-सी-आय ची मोबाइल ऍप देखील आहे; परंतु मला वाटते की हे सर्व दावे तपासणे व्यवहार्य नाही कारण देशभरातून दररोज शेकडो जाहिराती संदर्भात तक्रारी त्यांना येत असतील. म्हणून, ग्राहकांनी देखील शंकास्पद दाव्यांपासून सावध राहण्याची आवश्‍यकता आहे. कोणत्याही आरोग्यविषयक अहवालावर विश्‍वास ठेवण्याआधी त्यातील संशोधनाची संपूर्ण माहिती व संशोधनाचा खर्च उचलणाऱ्या संस्थेची माहिती जाणून घेणे सध्या गरजेचे आहे, असे मत पुणे येथील डॉक्‍टर दीप्ती पुंडले यांनी मांडले.

ग्राहकाची तक्रार जर खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत असेल तर ग्राहक भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण यांच्या संकेतस्थळावर तक्रार नोंदवू शकतो. त्याच बरोबर, या संदर्भात ग्राहक त्यांच्या राज्याच्या ग्राहक मंचाकडे, किंवा अन्न सुरक्षा विभाग आयुक्त (अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग) यांच्याकडे देखील तक्रार करू शकतो. एखाद्या खाद्य पदार्थामध्ये पाकिटावर उल्लेख केलेल्या सर्व घटकांचा समावेश आहे की नाही, पदार्थ आरोग्यासाठी योग्य आहे की नाही, याची पडताळणी सरकारमान्य खासगी प्रयोगशाळेत देखील करून घेता येते. परंतु यासाठी येणारा खर्च हा सर्वसामान्य लोकांना परवडेल असे नाही. आश्‍चर्यकारक बाब म्हणजे काही एफएमसीजी, कॉफी आणि शीतपेय निर्मिती करणाऱ्या कंपन्या, त्यांच्या उत्पादनांची विक्री वाढवण्यासाठी बनावटी वैद्यकीय संशोधनाचा वापर करतात.

नित्तेन गोखले

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)