पंतप्रधान म्हणून इम्रान खान यांच्या कारकिर्दीला प्रारंभ

इस्लामाबाद – एकेकाळी पाकिस्तानी क्रिकेट संघाचे कर्णधार असलेले इम्रान खान हे पाकिस्तानचेच कॅप्टन झाले आहेत. पाकिस्तानचे 22 वे पंतप्रधान म्हणून 65 वर्षीय इम्रान खान यांनी शपथ घेतली. पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष मामनून हुसेन यांनी त्यांना अध्यक्षीय प्रासादात झालेल्या एका समारंभात पंतप्रधानपदाची शपथ दिली. त्यांच्या शपथविधीचा कार्यक्रम आज नियोजित वेळेपेक्षा 40 मिनीटे उशिरा सुरू झाला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरूवात झाली आणि कुराणातील आयातीने समारंभाचा समारोप झाला.

राखाडी रंगाची शेरवानी घालून पंतप्रधानपदाची शपथ घेणारे इम्रान खान शपथविधीच्यावेळी थोडे भाऊक आणि थोडे नर्व्हस दिसले. त्यामुळेच बहुधा ते शपथ घेताना उर्दुभाषेतील शब्द उच्चारताना अडखळले. या कार्यक्रमाला लष्करप्रमुख जनरल बाजवा, भारताचे माजी क्रिकेटपटू नवज्योत सिद्धु, पाकिस्तानच्या विश्‍वचषक विजेत्या संघातील माजी क्रिकेटपटू वासिम अक्रम यांच्यासह विविध देशांचे राजदूत आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. आर्थिक दृष्ट्या अत्यंत जर्रजर्र झालेल्या या देशापुढे सध्या अनेक आव्हाने उभी असून अशा वातावरणात इम्रान खान यांनी पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारली आहे.

-Ads-

दहशतवादाला पायबंद घालण्यास अपयशी ठरल्याने अनेक देशांनी पाकिस्तानवरील आर्थिक निर्बंध कडक करीत आणले आहेत त्या आव्हानाचाही त्यांना मुकाबला करायचा आहे. सन 2016 पासून पाकिस्तानचे भारताबरोबरचे संबंध बिघडले असून शेजारील अफगाणिस्तानबरोबरही पाकिस्तानची कायमच धुसफूस सुरू आहे. अशा वातावरणात त्यांना देशाचे विदेश व्यवहार खातेही निभावून न्यावे लागणार आहे.

आव्हानांची जंत्री मोठी असली तरी नवीन इराद्याने त्याचा मुकाबला करण्याचा निर्धार इम्रान खान यांनी व्यक्त केला आहे. देशाची आर्थिक स्थिती ठीक करणे याला आपण सर्वाधिक प्राधान्य देणार आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. पाकिस्तानच्या चलनाचे मोठे अवमुल्यन झाले असून विदेशी चलनाची गंगाजळीही वेगाने कमी होत असल्याने या सरकारपुढील आर्थिक आव्हान बिकट बनले आहे. पाकिस्तानच्या राजकीय स्थितीत इम्रान खान यांच्या पंतप्रधान होण्याने यावेळी प्रथमच मोठा बदल झालेला दिसला.

अन्यथा गेली काहीं दशके पाकिस्तानची सत्ता केवळ पाकिस्तान पीपल्प पार्टी आणि नवाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान मुस्लीम लीग या दोन पक्षांमध्येच आलटून पालटून विभागलेली दिसली होती. कालच इम्रान खान यांनी नवनियुक्त संसदेत प्रथमच भाषण करताना पाकिस्तानला लुटणाऱ्यांना आपण धडा शिकवू असा निर्धार व्यक्‍त केला आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)