पंतप्रधान मोदी 19 ला शिर्डीत

साईबाबा समाधी शताब्दी समारोपाला उपस्थिती
शिर्डी – करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्याच्या समारोप कार्यक्रमाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी दिली.
साईबाबा संस्थानच्या वतीने दि. 1 ऑक्‍टोंबर 2017 ते 19 ऑक्‍टोंबर 2018 या कालावधीत साईबाबांच्या समाधी शताब्दी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचा समारोप 19 ऑक्‍टोंबर रोजी शिर्डी येथे मोदी यांच्या उपस्थित होणार आहे. त्यासाठी आज ना. शिंदे यांच्या उपस्थितीत साईबाबा संस्थानच्या सभागृहात नियोजन बैठक झाली. यावेळी साईबाबा संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे, उपजिल्हाधिकारी मनोज घोडे, उपकार्यकारी अधिकारी बाबासाहेब घोरपडे, नाशिक विभागाचे पोलीस आयुक्‍त छेरींग दोरजे, पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, साई मंदिराचे उपाधीक्षक आनंद भोईटे, पोलीस उपधीक्षक डॉ.सागर पाटील, तहसीलदार माणिक आहेर, नगर पंचायतचे मुख्याधिकारी सतीश दिघे, नायब तहसीलदार भालेराव, भाजपचे राजेंद्र गोंदकर, शहराध्यक्ष शिवाजी गोंदकर, रवींद्र गोंदकर आदी उपस्थित होते.
ना. शिंदे म्हणाले, साईबाबा विश्‍वस्तांकडून सोहळ्याच्या समारोपाची जय्यत तयारी सुरु केली आहे. या दरम्यान ग्रामविकास मंत्रालयाच्या पंतप्रधान आवास योजनेची सुमारे 2 लाख 44 हजार घरकुले पूर्ण झाली असून त्या लाभार्थ्यांना घरकुले वाटपाच्या कार्यक्रमाचा समावेश केले आहे. शेजारच्या चार जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी थेट मोदी संवाद साधणार आहे. त्याच बरोबर साईबाबा संस्थानच्या अत्याधुनिक दर्शन रांग आणि विविध कामांचा उद्‌घाटन मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी राज्यपाल सी.विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आदी उपस्थित राहणार आहेत.
साई समाधी शताब्दी वर्षात देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती शिर्डीत येवून गेले आहेत व सोहळयाच्या समारोपाला पंतप्रधान येत आहेत हा सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने आपल्याकडे असलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी, अशा सूचना त्यावेळी ना. शिंदे यांनी संबंधितांना दिल्या.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)