पंतप्रधान मोदींना संयुक्तराष्ट्रांचा चॅम्पियन ऑफ अर्थ पुरस्कार प्रदान 

नवी दिल्ली: संयुक्तराष्ट्रांचे सरचिटणीस ऍन्तोनिओ गुटेर्रेस यांच्या हस्ते आज दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संयुक्तराष्ट्रांचा चॅम्पियन ऑफ अर्थ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पर्यावरण रक्षणाच्या क्षेत्रात केलेल्या कार्याचा गौरव म्हणून फ्रांसचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांच्या समवेत मोदींना हा पुरस्कार संयुक्तपणे प्रदान करण्यात आला.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर केलेल्या भाषणात मोदी म्हणाले की वातावरण आणि नैसर्गिक आपत्ती हे दोन्ही विषय संस्कृतीशीही निगडीत आहेत. पर्यावरणाचे रक्षण हा जो पर्यंत आपल्या संस्कृतीचा भाग बनत नाही तो पर्यंत नैसर्गिक आपत्ती टाळणे मुष्किल आहे. ते म्हणाले की कृषी पासून औद्योगिक धोरणापर्यंत आणि रस्ते बांधणीपासून स्वच्छतागृहे बांधणीपर्यंत स्वच्छ पर्यावरणाला आपल्या सरकारने नेहमीच प्राधान्य दिले आहे. विषारी वायुचे प्रदुषण भारतात सन 2005 ला जेवढे होते त्याच्यात येत्या दोन वर्षात 20 ते 25 टक्के कपात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि सन 2030 सालापर्यंत हे प्रमाण 30 ते 35 टक्‍क्‍यांनी कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. एकदाच वापरायच्या प्लॅस्टिकची समस्या 2022 पर्यंत आम्ही पुर्ण पणे सोडवू असेही ते म्हणाले.
मोदी म्हणाले की भारताच्या संस्कृतीतच पर्यावरण रक्षणाचे महत्व अधोरेखीत करण्यात आले आहे. त्याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी संस्कृत मधील काही श्‍लोक आणि हिंदु पुराणामधील काही दाखलेही यावेळी दिले. स्वच्छ भारत मिशन मधून आम्ही देशातील लोकांच्या काही घातक सवयीही मोठ्या प्रमाणात बदलण्यात यशस्वी झालो आहोत. ते म्हणाले की आपल्याला मिळालेला हा सन्मान आपल्या प्राणापेक्षा झाडांना अधिक जपणाऱ्या अदिवासींचा आहे आणि गरजेपुरतेच मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांचाही आहे. वनस्पती आणि वृक्षांची पुजा करणाऱ्या भारतीय महिलांचाही हा सन्मान आहे. प्रत्येक बाबीचा पुनर्रवापर आणि त्याचे रिसायकल करण्याची वृत्ती भारतीय नागरीकांमध्ये मुळातच आहे त्यांचाही हा सन्मान आहे असे ते म्हणाले.
जागतिक वातावरणाचा संदर्भ देऊन ते म्हणाले की या वातावरण बदलाचा सर्वाधिक फटका गरीबांना बसतो आहे. गरीबांच्या आर्थिक उन्नतीसाठी आमच्या सरकारने अनेक उपक्रम हाती घेतले असून आर्थिक विकास दर वाढवून गरीबांना सन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी व्यापक प्रयत्न केले जात असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
संयुक्तराष्ट्रांचे सरचिटणीस गुटेर्रेस यांचेही यावेळी भाषण झाले. ते म्हणाले की पर्यावरणला साजेशी अर्थव्यवस्था ही सर्वात चांगली अर्थव्यवस्था असते. पर्यावरणाला साजेशा अर्थव्यवस्थेला पुरक असे तंत्रज्ञान आज उपलब्ध आहे. ज्यांना पर्यावरणाला डावलून विकास साधायचा आहे त्यांचे भवितव्यही अंधकारमय आहे असेही ते म्हणाले.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)