पंतप्रधान मोदींच्या आदेशानुसार महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी केली -जयंत पाटील

तासगाव,सांगली: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची कमी केली, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी तासगाव येथे केला. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात बूथ कमिटी तयार करण्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.

संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना अंधारात ठेवणाऱ्या आणि अंबानींना बरोबर घेऊन फ्रान्समध्ये राफेल विमानांचा करार करणाऱ्या देशातील क्रमांक एकच्या व्यक्तिवर लवकरच एफआयआर दाखल होईल, असा गौप्यस्फोट यावेळी पाटील यांनी केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ते पुढे म्हणाले की गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १८२ मीटर उंचीच्या पुतळा उभारणीचे काम २०१२ ला सुरू झाले होते. यानंतर आघाडी सरकारने अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच असा २०४ मिटरचा पुतळा उभा करण्याचा निर्णय घेतला. मी स्वतः त्या स्मारक समितीचा अध्यक्ष होतो. याबाबतचा प्रस्ताव आम्ही तयार केला होता, अशी माहिती त्यांनी दिली.

सरदार वल्लभभाई पटेल असामान्य व्यक्तिमत्व होते. त्यांच्या कर्तृत्वाची उंची खूप मोठी आहे. त्यांच्याबद्दल आम्हाला आदरच आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यापेक्षा मोठा होऊ नये म्हणून महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. मोदींच्या आदेशानुसारच महाराजांच्या पुतळ्याची उंची सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यापेक्षा कमी करण्यात आली आहे.

राफेल कराराची कल्पना देशाच्या एक नंबरच्या व्यक्तिने संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना दिली नव्हती. त्यांनी फ्रान्समध्ये जाऊन आमच्या देशात विमाने तयार करणारी अंबानीची एकमेव कंपनी असल्याचे सांगितले. भरमसाठ दराचा करार केला. ही बाब न्यायप्रविष्ठ आहे. राफेल करारातील भ्रष्टाचार लवकरच जगासमोर येईल. या प्रकरणी गुंतलेल्या देशातील नंबर एकच्या व्यक्तिविरोधात एफआयआर दाखल होईल. त्यांना पदावरून पायउतार व्हावे लागेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)