पंतप्रधानपदाचे उमेदवार बनण्याचा राहुल यांचा मार्ग खडतर

स्टॅलिन यांच्या प्रस्तावाशी काही विरोधी पक्ष असहमत

नवी दिल्ली – विरोधी पक्षांच्या प्रस्तावित महाआघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार बनण्याचा कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा मार्ग खडतर असल्याचे तूर्त तरी दिसत आहे. द्रमुकचे अध्यक्ष एम.के.स्टॅलिन यांनी राहुल यांचे नाव पुढे केले असले तरी त्या प्रस्तावाशी काही विरोधी पक्ष सध्या तरी असहमत असल्याचे स्पष्ट होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांत कॉंग्रेसने जोरदार मुसंडी मारताना भाजपला मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तिसगढ या तीन राज्यांच्या सत्तेवरून पायउतार केले. त्या यशामुळे पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसला मोठीच उभारी मिळाल्याचे चित्र आहे. त्याशिवाय, राहुल यांचे नेतृत्वही प्रस्थापित झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. अशातच स्टॅलिन यांनी रविवारी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून राहुल यांच्यासाठी बॅटिंग केली. विरोधी पक्षांनी राहुल यांच्या पाठिशी उभे राहण्याचे आवाहनही त्यांनी केले. मात्र, त्या आवाहनाला विरोधकांकडून लगेचच सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्‍यता नसल्याचे संकेत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि तृणमूल कॉंग्रेस या पक्षांनी दिलेल्या प्रतिक्रियांमुळे मिळत आहेत.

लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतरच पंतप्रधानपदाच्या उमेदवाराविषयीचा निर्णय घेतला जावा. तशी भूमिका केवळ आमचीच नसून इतर विरोधी पक्षांचीही आहे. आताच पंतप्रधानपदाच्या उमेदवाराची घोषणा करणे घाईचे ठरेल. त्यामुळे विरोधी गोटात फूट पडू शकते, असा इशारा तृणमूलने दिला. तर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरच पंतप्रधानपदाबाबतचा निर्णय होईल असे खुद्द कॉंग्रेसने स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्या मुद्‌द्‌यावर आताच चर्चा करण्यात अर्थ नाही, असे राष्ट्रवादीने म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)