पंढरपुरातील विठ्ठल मंदिराची मूळ वास्तू धोक्‍यात

अवास्तव बांधकाम : पुरातत्व विभाग करणार मंदिराचे स्ट्रक्‍चरल ऑडिट

सोलापूर – लाखो वारकरी संप्रदायाचे आराध्य असणारे विठ्ठल मंदिराची मूळ वास्तूला अवास्तव बांधकामामुळे धोका निर्माण झाला आहे. ही सर्व चुकीची बांधकामे हटवून गाभाऱ्यातही बदल केल्यानंतर मंदिर आणि मूर्तीचे आयुष्य वाढणार असल्याचा दावा पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज केला आहे.

विठ्ठल मंदिराच्या छतावर टाकण्यात आलेला स्लॅब आणि अनेक ठिकाणी केलेली अस्ताव्यस्त बांधकामे यामुळे छतावरील वाढलेला लोड मूळ मंदिरावर येऊ लागल्याने मूळ मंदिर वास्तूस धोका निर्माण झाल्याचे पुरातत्व विभागाचे म्हणणे आहे. आता संपूर्ण मंदिराचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करायचे काम पुरातत्व विभाग हाती घेणार आहे. यानंतर नेमके काय बदल करावे लागतील याचा अहवाल ते मंदिर समितीपुढे ठेवणार आहेत. राज्य पुरातत्व विभागाचे औरंगाबाद येथील सहाय्यक संचालक विलास वहाणे आणि त्यांच्या टीमने आज विठ्ठल मंदिराची पाहणी केली.

मूळ मंदिराचे बांधकाम संपूर्ण दगडी पद्धतीने झाले असून ते यादवकालीन साधर्म्याचे अनेक शिल्पकलेवरून दिसून येते. यानंतरच्या काळात मंदिराच्या शिखराचे काम झाले असल्याचा अंदाज पुरातत्व विभागाला वाटतो आहे. यानंतरच्या काळात मात्र मूळ मंदिराच्या छतावर जाडजूड स्लॅब टाकण्यात आल्याने मूळ मंदिरावरचा बोजा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यातच हवा खेळण्यासाठी मंदिराच्या छतावरील अनेक ठिकाणाची मूळ दगडे काढून तेथे हवा बाहेर जाण्यासाठी मोठ्या आकाराची सवणे केल्याने वास्तूचे छत कमकुवत झाले आहे.

यातच छतावर विविध प्रकारची बांधकामे, वातानुकूलित यंत्रणेचा बेस अशा पद्धतीचा बोजा वाढत गेल्याने मूळ मंदिरावरील बोजा वाढला आहे. यामुळे मंदिराचे दगडी बीम क्रॅक झाले असण्याची भीती पुरातत्व विभागाचे अधिकारी व्यक्त करीत आहेत. याचबरोबर मूळ मंदिरातील पुरातन दगडू काही ठिकाणी निसटू लागली असून काही ठिकाणी दगडी वास्तूला भेगा पडू लागल्या आहेत.

गाभाऱ्यात अनेक ठिकाणी मूळ वास्तूचे स्वरूपाचं सुधारणेच्या नावाखाली झाकून टाकल्याने आता हे सर्व पूर्ववत करावे लागेल, असे पुरातत्व विभागाचे म्हणणे आहे. याबाबत तातडीने संपूर्ण मंदिराचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्याचे काम पुरातत्व विभाग हाती घेत असून हा अहवाल समितीसमोर ठेवला जाणार आहे. मात्र विठ्ठल मंदिर हे केंद्र आणि राज्य यापैकी कोणत्याच पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत नसल्याने अशा पद्धतीची धोकादायक आणि मारक बांधकामे होत आली आहेत. आता या संपूर्ण मंदिराचा ताबा राज्य सरकारचा झाल्यावर तरी हे मंदिर पुरातत्व विभागाच्या ताब्यात देण्याची मागणी मंदिर समितीचे सदस्य शिवाजीराव मोरे यांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)