पंजाब : कॉंग्रेस हाच उत्तम ‘पर्याय’ ठरला

नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेने पुन्हा एकदा आपला करिष्मा दाखविला आणि उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या दोन राज्यात विरोधी पक्षांची दाणादाण उडविली. मात्र पंजाबमध्ये मोदी लाट रोखण्यात कॉंग्रेसने यश मिळविले. पंजाबमधील कॉंग्रेसचा हा विजय तसा अपेक्षितच होता. कारण सत्तारूढ अकाली दलाच्या कारभाराला कंटाळलेल्या तेथील जनतेला दोनच पर्याय उपलब्ध होते. एक म्हणजे आम आदमी पार्टी किंवा कॉंग्रेस. आम आदमी पार्टीने बादल सरकारविरुद्ध रान पेटविले खरे मात्र त्याचा फायदा कॉंग्रेसलाच जास्त झाला आणि पंजाबच्या जनतेने आपला कौल कॉंग्रेसच्या पारड्यात टाकून देशात सर्वत्र पीछेहाट होत असलेल्या कॉंग्रेसला जणू संजीवनी प्राप्त करून दिली. अर्थात पंजाबमधील कॉंग्रेसच्या विजयाचे श्रेय प्रामुख्याने ‘सिंग इज किंग’ ठरलेल्या कैप्टन अमरिंदर सिंग यांनाच जाते. पक्षाच्या प्रदेश प्रमुखाची जबाबदारी हाती घेतल्यापासून त्यांना पक्षश्रेष्ठींनी जणू ‘फ्री हैंन्ड’ दिला होता. किंबहुना कैप्टन अमरिंदर सिंग यांनीच पक्षश्रेष्ठींना तसे करण्यास भाग पाडले होते. सत्तारूढ अकाली दल आणि भाजप युती विरुद्ध असलेल्या जनतेच्या प्रचंड नाराजीचा फायदा घेण्यात कैप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस यशस्वी ठरली आणि विधानसभा निवडणुकीत या पक्षाला 117 पैकी 77 (सुमारे दोन तृतीयांश) जागा मिळाल्या. पंजाबमध्ये सत्तेची स्वप्ने पाहणाऱ्या आम आदमी पार्टीला अवघ्या 20 जागांवर समाधान मानावे लागले तर अकाली दल-भाजप युतीला फक्त 18 जागा मिळाल्या.
पंजाबमध्ये यावेळी परिवर्तनाचे वारे वाहत होते त्यामुळे सत्तारूढ अकाली दल- भाजपचा पराभव अटळ असल्याचे चित्र सुरुवातीपासूनच दिसत होते. बादल सरकारचा भ्रष्टाचार आणि अंमली पदार्थांच्या विळख्यात सापडलेल्या युवक वर्गाकडे हेतुपुरस्सर करण्यात येत असलेले दुर्लक्ष यामुळे अकाली दल-भाजप आघाडी सरकारविरुद्ध असलेली जनतेची नाराजी मोठ्या प्रमाणावर दिसत होती. ही गोष्ट भाजप पक्षश्रेष्ठींच्याही लक्षात आली होती मात्र भाजपला अकाली दलाशी युती कायम ठेवण्याशिवाय पर्यायच नव्हता. अकाली दलाबरोबर युती केल्यामुळे भाजपची चांगलीच फरपट झाली. आणि देशात सगळीककडे भाजपची विजयी घोडदौड चालू असताना पंजाबमध्ये मात्र या पक्षाला दारुण पराभव स्वीकारावा लागला.
पंजाबच्या जनतेची बादल सरकारविरुद्ध असलेली वाढती नाराजी लक्षात घेऊन आम आदमी पार्टीने पंजाबची निवडणूक जिंकण्याचा चंग बांधला होता. 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंजाबमधून आम आदमी पार्टीचे चार खासदार ‘मोदी लाटेत’ही निवडून आले होते. लोकसभा निवडणुकीत ‘आप’ला 30 टक्के मते मिळाली होती. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीतही आम आदमी पार्टीला चांगले यश मिळेल असा विश्वास ‘आप’चे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना वाटत होता. त्यासाठी वारंवार पंजाबमध्ये जाऊन आणि वेगवेगळ्या क्‍लृप्त्या लढवून त्यांनी ‘आप’ बद्दल जनतेचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. विधानसभा निवडणूक जाहीर होण्याच्या आतच आम आदमी पार्टीने आपले बरेच उमेदवार जाहीर करून बाजी मारली होती मात्र मुख्यमंत्री म्हणून ‘आप’ कडे पंजाबमधलाच ‘जाट-शीख’ असलेला असा चांगला चेहरा नव्हता. सुरुवातीला भाजपमधून बाहेर पडलेले नवज्योत सिंग सिद्धू ”आप’ मध्ये येण्यास उत्सुक असताना त्यांनाही ‘आप’ मध्ये घेण्यास केजरीवाल यांना अपयश आले. याशिवाय पंजाबमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी ‘आप’ ने कॅनडा आदी देशांतील कट्टरपंथी अनिवासी शीख नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळविला होता. मात्र त्याचा उलट परिणाम झाला. केजरीवाल यांनी कट्टरपंथीयांशी साधलेल्या जवळकीमुळे शहरी हिंदू मतदार आणि आधुनिक शीख तरुण ”आप’ पासून दुरावला आणि त्याचा फायदा साहजिकच कॉंग्रेसला झाला.
कॉंग्रेसने ही निवडणूक कैप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली लढवावी असे पक्षश्रेष्ठींनी आधीच ठरविले होते. त्यानुसार गेल्या नोव्हेंबर महिन्यात अमरिंदर सिंग यांची प्रदेश अध्यक्षपदी निवड करण्यात आली. याशिवाय निवडणुकीसाठी पक्षाचे प्रभारी म्हणून कमल नाथ यांच्याऐवजी हिमाचल प्रदेशच्या कॉंग्रेस आमदार आशा कुमारी यांची निवड करण्यात आली. त्यांनी कैप्टन अमरिंदर सिंग यांचे पक्षातील कट्टर प्रतिस्पर्धी असलेले प्रताप बाजवा, राजिंदर कौर भट्टल, ब्रह्म मोहिंदर आदी नेत्यांची समजूत काढून त्यांना अमरिंदर सिंग यांच्या पाठीशी उभे करण्यात यश मिळविले त्यामुळे पक्ष अधिक बळकट झाला. स्वत: अमरिंदर सिंग यांनी लोकसभा निवडणुकीत अमृतसर मतदारसंघातून मोदी लाटेतही भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचा पराभव करून भाजपाला धक्का देत स्वतःची वेगळी इमेज निर्माण केली होती. तसेच विधानसभा तिकीटवाटपाच्या वेळी त्यांनी ‘वन फॅमिली वन तिकीट’ हे सूत्र कटाक्षाने पाळले त्यामुळे चांगल्या कार्यकर्त्यांवर फार अन्याय झाला नाही. याशिवाय भाजपवर नाराज झालेले आणि अकाली दलाचे नेते बादल यांच्या पतनाची ‘प्रतिज्ञा’ केलेले नवज्योत सिंग सिद्धू सारखे युवकांवर छाप पडणारे ‘बोल बच्चन’ नेते निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसमध्ये सामील झाले त्यामुळे एकीकडे भाजपचे नुकसान झाले तर दुसरीकडे कॉंग्रेसला त्याचा फायदा झाला. आणि पंजाबमध्ये कॉंग्रेसची सत्ता आली.
कैप्टन अमरिंदर सिंग हे आता येत्या 16 मार्चला पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यापुढे अनेक आव्हाने असतील त्याचा ते कसा मुकाबला करतील हे लवकरच कळून येईल. पंजाबमध्ये दहा वर्षानंतर कॉंग्रेसला सत्ता मिळाली आहे ही सत्ता टिकविण्यासाठी त्यांना चांगले काम करून दाखवावेच लागेल एवढे मात्र निश्‍चित.

—– श्रीकांत नारायण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)