पंचायत राज समितीची अधिकाऱ्यांना तंबी

नीट उत्तरे, आकडेवारी देता न आल्याने निलंबनाचा इशारा
शेवगाव – महाराष्ट्र विधिमंडळाच्या पंचायत राज समितीने शेवगाव पंचायत समितीला भेट दिली. त्या वेळी झालेल्या बैठकीत अनेक अधिकाऱ्यांना नीट उत्तरे व आकडेवारीही देता आली नाही. त्यामुळे जवळपास सर्वच विभाग प्रमुखांची झाडाझडती घेत कामात सुधारणा करण्याची तंबी या समितीने दिली. निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा समितीच्या सदस्यांनी दिला.
पंचायत राज समितीचे गट प्रमुख आ. भारत गोगावले, सदस्य आ. दिलीप सोपल, आ. दत्तात्रय सावंत, आ. श्रीकांत देशपांडे यांनी भेट देऊन समितीच्या सभागृहात बैठक घेतली. शेवगाव व ढोरजळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देण्याचे नियोजन होते; मात्र उशीर झाल्यामुळे इतरत्र कोठेही त्यांनी भेट देण्याचे टाळले. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व ग्रामसेवकांनी सुस्कारा सोडला. वाघोली येथे शालेय पोषण आहाराबाबत तक्रारी झाल्या होत्या. त्यांचे नमुने तपासले असता ते निकृष्ट दर्जाचे आढळले. इतर शाळांना हा आहार कसा पुरवण्यात आला, संबधित कंत्राटदारावर काय कारवाई करण्यात आली, त्याचा माल घेणे बंद का केले का, अशी विचारणा करत शिक्षण विभागाला धारेवर धरले. लघुपाटबंधारे विभागाला किती निधी आला व त्यातील किती खर्च झाला याची आकडेवारी संबधित उपअभियंत्याला देता आली नाही. “त्यावर तुमचा पगार किती? तेवढा तरी निधी तुम्ही खर्च केला का?’ असे विचारले असता तो अधिकारी निरुत्तर झाला.
प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्यांचा दर्जा निकृष्ट असल्याच्या तक्रारी असून त्याकडे लक्ष देऊन दर्जा सुधारावा, अशा सूचना समितीने केल्या तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात वीजपुरवठा, पाणीपुरवठा, औषधसाठा आहे का, श्वानदंश व सर्पदंशावरील औषधे आहेत का, याची चौकशी समितीने केली. हृदयरुग्णांचा पाठपुरावा व कुपोषित बालकांची आणि शालेय विद्यार्थ्यांची तपासणी नियमीत केली जाते का? प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्‍टर व कर्मचारी वेळेवर येतात का? अशी विचारणा करून याचा नियमित आढावा घेत जा तसेच तेथे नियमित स्वच्छता ठेवत जा, असे आदेश तालुका आरोग्य अधिकारी एस. एम. हिराणी यांना दिले. शासनाच्या लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवा, त्यात जाणीवपूर्वक चुका करू नका. अन्यथा, कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवा, असे ही या वेळी समितीने सुचवले.
ही बैठक गोपनीय असल्याने बैठकीत पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी वगळता इतर कुणालाही प्रवेश नव्हता. जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनाही बैठकीत बसू दिले नाही.त्यामुळे वेगवेगळ्या मागण्या करण्यासाठी आलेल्या नागरिकांनी बैठक संपल्यावर पंचायत राज समिती सदस्यांची भेट घेतली. पंचायत समितीच्या जुन्या इमारतीत असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा नवीन इमारतीच्या प्रांगणात बसवावा अशी मागणी ज्ञानेश्वर खबाले व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली, त्यावर त्वरीत अंमलबजावणी करावी, असे आदेश आ. गोगावले यांनी गटविकास अधिकारी अशोक भवारी यांना दिले. आखेगावला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फोडून बांधकामासाठी अनधिकृत नळजोड घेणाऱ्या सालवडगाव शिवारातील कारखान्यावर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन उपसरपंच शिवाजी नाचण, ग्रामपंचायत सदस्य वृंदावनी डोंगरे, माजी सरपंच माधव काटे व ग्रामस्थांनी दिले. शहरटाकळी पाणीपुरवठा योजना त्वरीत सुरू करून बांधकाम पूर्ण असलेले हातगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तातडीने सुरू करा, असे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहराध्यक्ष दत्ता फुंदे यांनी दिले.

वीज नसलेल्या शाळांना एलईडी, एलसीडी

-Ads-

अघोषित सक्तीच्या जबरदस्त वर्गणीची दबक्‍या आवाजातील चर्चा येथे लक्ष वेधून घेत होती, तर शैक्षणिक क्षेत्रात एलईडी, एलसीडी व संगणकाद्वारे प्रगती होत असल्याने अनेक शाळेत या शैक्षणिक सुविधा करण्यात आल्या असल्या, तरी त्यासाठी अनेक शाळातून वीजपुरवठाच नाही तसेच अनेक शाळांना वर्गखोल्या नसल्याने विद्यार्थी बाहेर बसतात, ही वस्तुस्थिती पंचायत राज समितीला रात्रीमुळे पाहता आली नाही

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)