पंचायतराज व्यवस्था टिकलीच पाहिजे

आ. पृथ्वीराज चव्हाण : अधिवेशनात आवाज उठविणार, सदस्यांच्या पाठिशी राहणार

कराड – पंचायत समित्या या जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतींमधील दुवा आहेत. स्व. यशवंतराव चव्हाण यांनी पंचायत राज व्यवस्था निर्माण करून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना दिली. तसेच सत्तेचे विकेंद्रीकरण केले. मात्र, सध्याचे सरकार ही व्यवस्था मोडीत काढायला निघाले आहे. खरे तर ही व्यवस्था टिकली पाहिजे. पंचायत समितीला ठोस अधिकार आणि निधी मिळायला पाहिजे. यासाठी आपण अधिवेशनात आवाज उठवू आणि पंचायत समिती सदस्यांच्या न्याय मागण्यांच्या पाठिशी राहू, अशी ग्वाही माजी मुख्यमंत्री, आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रीतिसंगमावरील समाधी परिसरात राज्यभरातील सर्वपक्षीय पंचायत समिती सदस्यांच्या सुरू असलेल्या साखळी उपोषणाला आ. चव्हाण यांनी गुरूवारी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आ. शशिकांत शिंदे, आ. आनंदराव पाटील, अजित पाटील-चिखलीकर, इंद्रजित चव्हाण, राहूल चव्हाण यांची उपस्थिती होती. आ. चव्हाण म्हणाले, पंचायत समिती सदस्यांना अधिकारशून्य करून आणि विकास निधीला कात्री लावून पंचायत समित्यांचे अस्तित्वच संपुष्टात आणण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. वास्तविक पंचायत समितीचा संबंध हा ग्रामीण भागाशी येतो. निवडून दिलेल्या सदस्यांना ग्रामीण भागातील कामे करण्यासाठी पुरेसा निधी लागतो.

अन्यथा सामान्यांच्या अपेक्षांची पूर्तता होत नाही. तथापि, या सदस्यांच्या हक्‍क आणि अधिकारावर गदा आणण्यात आल्याने पंचायत समिती सदस्यांच्या हक्‍क, अधिकाराला बाधा आली आहे. सदस्यांच्या रास्त मागण्यांबाबत मी अधिवेशनात आवाज उठविणार आहे. काही निर्णयात बदल करण्यासाठी अध्यादेश काढावा लागणार आहे. त्यासाठीही आम्ही विधानसभेत प्रयत्न करू. आ. शिंदे म्हणाले, पंचायत समिती सदस्यांना तुटपुंजा निधी देवून आणि त्यांच्या हक्‍क, अधिकारांवर गदा आणून सरकार पंचायत राज व्यवस्था मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे पंचायत राज व्यवस्था निर्माण करणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी परिसरात सर्वपक्षीय सदस्यांना आंदोलन करावे लागत आहे.

यापूर्वी आझाद मैदानात केलेल्या आंदोलनालाही आम्ही पाठिेंबा दिला होता. याही आंदोलनाला आमचा पाठिंबा असून आम्ही सदस्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सभागृहातही आवाज उठवू. सरकारने पंचायत समिती सदस्यांच्या विकास निधीत वाढ केली पाहिजे. तसेच त्यांना अधिकारही दिले पाहिजेत. तरच पंचायत राज व्यवस्थेचा हेतू सफल होईल. यावेळी आ. आनंदराव पाटील यांनीही आपला पाठिंबा जाहीर करून सभागृहात यासंदर्भात मुद्दा उपस्थित करण्याची ग्वाही आंदोलक सदस्यांना दिली. आंदोलनाला बसलेल्या सदस्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तिन्ही आमदारांना दिले. तसेच आमच्या मागण्यांवर सभागृहात आवाज उठविण्याची मागणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)