पंचांग न पाहता दुष्काळ जाहीर करावा- उद्धव ठाकरे

मराठवाड्यामध्ये दुष्काळाची भीषण दाहकता ; आगामी निवडणुका स्वबळावरच लढविण्याचे संकेत

 लातूर: मराठवाड्यामध्ये दुष्काळाची दाहकता भीषण असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंचांग न पाहता दुष्काळ जाहीर करावा. राज्याचे मुख्यमंत्री हातात पंचांग घेऊन दुष्काळ जाहीर करण्याचा मुहूर्त शोधत आहेत का असा सवाल करून विधानसभाच नाही तर लोकसभेवरही भगवा फडकवला जाणार आहे. आगामी निवडणुकीत शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असल्याचा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लातूर जिल्ह्यातील बूथ प्रमुखांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी खासदार चंद्रकांत खैरे, खासदार डॉ. रवि गायकवाड, मिलींद नार्वेकर यांचीही उपस्थिती होती. भाजपने युतीबाबत अल्टीमेटम दिल्यांनतरही त्यांनी आगामी निवडणुका स्वबळावरच असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यादरम्यान शिवसैनिकांना विविध विषयांवर मार्गदर्शन करीत त्यांनी भाजपवरही सडकून टिका केली. राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गावागावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. एका रात्रीत नोटाबंदी करताना सर्वसामान्यांचा विचार न करणारे हे भाजप सरकार आता दुष्काळ जाहीर करण्यासाठी वेगवेगळ्या समित्यांचा अहवाल घेत आहे. त्यामुळे वेळीच दुष्काळाबाबत निर्णय न घेतल्यास शिवसेना रस्त्यावर उतरणार असल्याचा इशाराही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला आहे.

मराठवाड्यात दुष्काळजन्य परिस्थिती आहे, तर लातुरात शिवसेनेचाही दुष्काळ असल्याचे सांगून उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची कानउघडणी केली. मात्र, येथील सर्वसामान्य नागरिकांमधील उत्साह पाहून आपण आशादायी आहोत. पदाधिकाऱ्यांनीही जोमाने कामाला लागणे आवश्‍यक आहे. पक्षाने योग्य रणनिती आखली असून त्याची अंमलबजावणी करण्याचे अवाहन त्यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना केले.

दुसरीकडे आगामी लोकसभा विधानसभा निवडणुका समोर ठेऊन त्यांनी भाजपने दिलेली आश्वासने पाळली आहेत की नाही ? योजनांचा लाभ प्रत्यक्षात सर्वसामान्यांना मिळाला आहे की नाही ? याची चाचपणी करुन सत्य बाहेर काढण्याचे आदेश दिले आहेत.

गेल्या 4 वर्षात दिलेली आश्वसाने न पाळता आता आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन घरकुल योजना, गॅस वाटपाचे आमिष दाखविले जात आहे. 2022 पर्यंत घरे पाहिजे असतील तर 2019ला भाजपलाच मत द्या असा त्याचा अर्थ आहे. परंतु, जनता पुन्हा ती चूक करणार नसल्याचा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच

आम्ही राजकारण करीत नाही. जनतेच्या मदतीला धावून जातो. त्यामुळे पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल. मी सरकारच्या विरोधात नाही, तर जनतेच्या बाजूने आहे. जनतेचे प्रश्न मांडत आहे. सरकार चूकत असेल तर आसूड ओढणारच. गेल्या निवडणुकीत भाजपवाल्यांनी खोटे बोलून मते घेतली. अजूनही ते वारंवार खोटेच बोलत आहेत. त्यात मी वाटेकरी होणार नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे मला माफ करणार नाहीत. तसेच राज्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी उपग्रहामार्फत करणार असल्याच्या वृत्ताचा धागा पकडत उद्धव ठाकरे म्हणाले की, सगळे काही उपग्रहावरूनच कळत असेल तर मग उपग्रहालाच मुख्यमंत्री का बनवत नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांना लगाविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)