पंकज देशमुखांनी “मोक्‍क्‍या’चे खाते उघडले

सम्राट खुन प्रकरणातील आरोपींवर मोक्का; रावण टोळीतील दहा जणांचा समावेश

सातारा – सातारा शहरातील कोडोली परिसरात खंडणीसाठी सम्राट निकम याचा खून करणाऱ्या रावण टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. दि. 15 जानेवारी रोजी सम्राटचा खुन केल्याप्रकरणी मयुर जाधव उर्फ रावण व त्याच्या टोळीतील चौघांच्या मुसक्‍या सातारा शहर पोलिसांनी आवळल्या होत्या. त्यानंतर टोळी प्रमुख मयुर जाधव उर्फ रावण (रा.कोडोली), सौरभ खरात उर्फ कुक्‍या, धीरज शेळके, संग्राम दणाने व त्यांचे तीन ते चार साथीदार (सर्व रा. मल्हारपेठ,सातारा) बाळकृष्ण जाधव, शशिकांत जाधव, विजय जाधव, बाळासाहेब तांगडे (सर्व रा. कोडोली,सातारा) यांच्याविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख यांनी पोलिस महानिरीक्षक कार्यालयाकडे पाठवला होता. त्याला मंजुरी मिळाल्याने या टोळी सदस्यांच्या मालमत्तेची माहिती घेवुन पुढील कारवाईचा फास आवळला जाणार आहे. एसपी पंकज देशमुख यांनी साताऱ्याची सुत्रे हाती घेतल्यानंतर मोक्‍याची पहिलीच कारवाई करून “मोक्का’ कारवाईचे खाते उघडले आहे.

दि.15 जानेवारी रोजी कोडोली, ता. सातारा येथील दत्तनगर वसाहती शेजारील काळोशी गावाकडे जाणाऱ्या सातारा-रहिमतपूर रस्त्यावरील चौकात सम्राट विजय निकम (वय 27) याचा पूर्ववैमनस्यातून धारदार शस्त्राने वार करून व बेसबॉलच्या लाकडी दांडक्‍याने मारहाण करत निर्घृण खून करण्यात आला होता. याप्रकरणी सम्राटचे चुलते संजय निकम यांच्या तक्रारीवरून सुमारे बाराजणांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. मयुर राजेंद्र जाधव (रा.कोडोली)सौरभ खरात उर्फ कुक्‍या, धीरज शेळके, संग्राम दणाने व त्यांचे तीन ते चार साथीदार (सर्व रा. मल्हारपेठ,सातारा)बाळकृष्ण जाधव,शशिकांत जाधव,विजय दिनकर जाधव,बाळासाहेब तांगडे (सर्व रा. कोडोली,सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हा खुन जुन्या भांडणाच्या व व्यवसायातील हप्ता न दिल्यानेच केल्याचे संजय निकम यांनी तक्रारीत म्हटले होते.

4 ते 5 हल्लेखोरांनी त्याच्यावर बेसबॉल, स्टीक व धारदार कोयत्याने वार केल होते.या हल्ल्यात सम्राट गंभीर जखमी झाला व तेथेच रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. हल्लेखोरांनी डोक्‍यात व तोंडावर वर्मी घाव केल्याने सम्राट रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळला होता. त्यानंतर त्याचा जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सुत्रांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर पोलिसांनी या टोळीचा प्रमुख मयुर उर्फ राजेंद्र जाधव (रा. कोडोली) सौरभ उर्फ कुक्‍या कैलास खरात (रा.गुरूवारपेठ,सातारा) प्रमोद जाधव (रा.कोडोली) यांच्या मुसक्‍या आवळल्या होत्या.

मयुर जाधव याच्या विरोधात दरोडा, खंडणी, दुखापत करणे, गर्दी जमवुन मारामारी करणे असे गंभीर गुन्हे सातारा शहर पोलिस ठाण्यात दाखल आहेत.तसेच तो स्वत:च्या व टोळीच्या आर्थीक फायद्यासाठी गंभीर गुन्हे करत असल्याचे तपासात समोर आले आहे. त्याच्यावरील गंभीर गुन्ह्यांची मालिका मोठी असल्याने सातारा शहर पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या टोळीच्या विरोधातील मोक्का कारवाईचा प्रस्ताव तयार केला होता.

त्या प्रस्तावाची छाननी करून जिल्हा पोलिस प्रमुखांनी विषेश पोलिस महानिरीक्षक कार्यालयाकडे पाठवला होता. त्याला पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांनी मंजुरी दिल्याने रावण टोळीच्या मुसक्‍या आवळण्यास मदतच होणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)