न मिटणारा हिंसाचार (अग्रलेख)

तुमच्यापेक्षा कमजोर अथवा दुर्बल घटकाशी तुमचे आचरण कसे आहे, यावरून तुमचे संस्कार, सभ्यता आणि संवेदनशीलता ठरत असते. जे एका व्यक्‍तीच्या बाबतीत तोच न्याय समाजालाही लागू होतो. सभ्य समाजाची ओळख निर्धारित करणाऱ्या घटकांत इतरांप्रती सहिष्णुता आणि सहानुभूती या बाबींना अनन्यसाधारण महत्त्व असते. समाज काही मोजक्‍या व्यक्‍तीचा पुंजका नसतो; तद्वतच समाजात राहणारे सगळे एकसमान पातळीवरही नसतात. आर्थिक, वर्गीक अथवा लैंगिक अशा घटकांच्या आधारावर श्रेष्ठत्व व कनिष्ठत्व ठरत असते. त्यावरूनच कोणीतरी बलशाली आणि कोणीतरी दुर्बल घटक ठरत असतो. अशा या दुर्बल घटकांत लैंगिकतेच्या आधारावर कायम दुय्यमत्व स्वीकारून जगणाऱ्या महिला या घटकाचा समावेश होतो. त्यांच्या संदर्भात दोन दिवसांपूर्वी आलेल्या आणखी एका अहवालाने महिलांची आपल्या समाजातील सगळ्यांनाच ठाऊक असलेली स्थिती पुन्हा एकदा नव्याने समोर आणली आहे.

गुजरातच्या वडोदरा येथील एका स्वयंसेवी संस्थेने एक अहवाल सादर केला आहे. त्यानुसार भारतात राहणाऱ्या एक तृतीयांश महिला पतीकडून होणाऱ्या हिंसाचाराने पीडित आहेत. 15 ते 49 या वयोगटातील तब्बल 27 टक्‍के महिला या वयाच्या 15 व्या वर्षापासूनच हिंसाचाराला सामोरे जात आल्या आहेत, असे हा अहवाल सांगतो. सगळ्यांत वैषम्यपूर्ण म्हणजे यातील बहुतेक महिलांनी हा हिंसाचार कुठेतरी मान्य केला आहे. पतीकडून मारहाण होत असण्यात काही गैर नाही. वैवाहिक जीवनाचा तो भाग आहे, हे या महिलांनी स्वीकारले आहे. गेल्या काही काळात महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी सरकारच्या पातळीवर बरेच प्रयत्न करण्यात आले आहेत. काही संस्थाही महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी व त्यांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देण्यासाठी झगडत असतात. त्यांच्याच संघटितपणे आवाज उठवण्याच्या व हा मुद्दा सातत्याने लावून धरण्याच्या प्रयत्नांना चांगले यश आले आहे.

-Ads-

नवे कायदे करण्यात आले. परिस्थितीचा आढावा घेत काही पळवाटा बंद करण्यात आल्या. मग खरेतर चित्र बदलायला हवे होते. मात्र तसे काहीही झाले नसल्याचे व महिलांची जी अवस्था काही दशकांपूर्वी होती, तीच आजही आहे हे जळजळीत व तेवढेच दाहक वास्तव आजही समोर येत आहे. गेल्या महिन्यात “मी टू’ नावाची मोहीम तनुश्री दत्ता या अभिनेत्रीमुळे चर्चेत आली होती. मात्र सुरुवातीला “परदु:ख शीतल’ म्हणतात त्याप्रमाणे त्याकडे दुर्लक्ष केले गेले. किंबहुना “रंजक बातम्या’ असेच त्याचे स्चरूप राहिले. भारतात जेव्हा या चळवळीला वाचा फुटली व चित्रपटसृष्टी सोडून त्याचा मोर्चा अन्यत्र वळला, तेव्हा त्याला गांभीर्याने घेतले गेले. “विशाखा समिती’ व मार्गदर्शक तत्त्वे आदींबाबत चर्चा झाली. केंद्रीय महिला आयोगही सक्रिय झाला. पण “मी टू’चा पटलही वेगळा होता व आहे.

कामाच्या ठिकाणी होणाऱ्या महिला यात पीडित होत्या. यात चित्रपटसृष्टीतील कलाकारांपासून कॉर्पोरेट जगतात वावरणाऱ्या उच्च पदस्थांचाही समावेश होता. एका अर्थाने घराबाहेर पडणाऱ्या महिलांचा हा मुद्दा होता व त्यांच्या संरक्षणासाठी कायदे असतानाही शोषणाचे प्रकार घडले. मात्र हे सगळे होत असताना सुरक्षित चौकटीच्या आत आजही तेवढाच अंधार आहे, ही बाब दुर्लक्षित राहतेय, याकडे कोणाचे फारसे लक्ष गेले नाही. देशभरातील एकतृतीयांश महिलांना घराच्या चार भिंतीच्या आतच मारझोड होत असेल आणि कायदा असूनही त्याचा उपयोग करण्यास त्या धजावत नसतील, तर बराच प्रवास अजून बाकी असून, ही वाट प्रचंड बिकट असल्याचे ध्यानात घ्यायला हवे. आर्थिक असुरक्षितता आणि समाजात नशिबी येणारे एकाकीपण व त्यातून पुन्हा सुरक्षेचा निर्माण होणारा गंभीर प्रश्‍न, या सगळ्या गोष्टी याला कारणीभूत आहेत.

पतीची मारहाण सहन करूनही व लाजीरवाणे व अवहेलनेचे जगणे स्वीकारूनही महिला त्या घरात अंतिम श्‍वास घेईपर्यंत जगत राहते, त्याला आर्थिक सुरक्षाच प्रमुख कारण असते. हाच आपला पोषणकर्ता आहे व याच्या आधाराशिवाय आपल्याला गत्यंतर नाही, हे तिच्या मनाने स्वीकारलेले असते नव्हे, आपल्या पितृप्रधान संस्कृतीत तिच्यावर बिंबवले असते. ज्या महिला आर्थिक स्वावलंबी आहेत, त्यांना बाहेरच्या पशूंची चांगली कल्पना असते. बाहेर कोणीतरी लचके तोडण्यापेक्षा या चार भिंतीत कथित सन्मानाने राहात जगावे असा सोशिकपणाचा व्यावहारिक विचार करून त्या जुळवून घेतात. नेमके हेच आणि येथेच चुकते आहे. मुलांचे भविष्य आणि कुटुंबाची प्रतिष्ठा आणि मर्यादा हे पीडित महिलेच्या संयमाला कारणीभूत ठरत असतात. पण हा संयम दीर्घकाळ टिकू शकत नाही. स्वतंत्र, स्वावलंबी होण्याच्या प्रवासात खाचखळगे भरपूर असले तरी आतापर्यंत प्रवासात आपल्याला प्रत्येक गोष्ट झगडूनच मिळाली आहे, हा इतिहासही महिलांनी विसरता कामा नये. कोणी काय म्हणेल व आपले काय होईल याचा विचार जरूर व्हावा. मात्र आपल्या अस्तित्वाचाही व जगण्याचाही त्यांनी विचार करून मौन सोडत वेळीच आवाज द्यायलाही शिकायला हवे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)