‘न्यू फलटण शुर्गस’चा कारभारी बदलणार

कारखाना घेण्यासाठी सरसावले उद्योजक काकडे
फलटण – साखरवाडी, ता. फलटण न्यु फलटण शुगर वर्क्‍सच्या थकीत ऊसबीलासाठी अंतिम टप्यात वाटाघाटी झाली आहे. सातारा येथील उद्योजक राजेंद्र विष्णू काकडे हे कारखाना घेण्यासाठी पुढे सरसावले आहेत. त्या अनुषंगाने कारखाना व काकडे यांच्यात करार झाला असल्याने आता न्यू फलटण शुगर्सचे कारभारी लावकरच बदलणार आहेत.

साखरवाडी येथील न्यु फलटण शुगर वर्क्‍स कारखान्याने मागील हंगामात गाळपास आलेल्या उसाची बिले न दिल्याने या कारखान्याला ऊस पुरवठा करणारे शेतकरी अडचणीत आले आहेत. विविध मार्गांनी आत्तापर्यंत शेतकऱ्यांनी आंदोलन करून कारखाना प्रशासनाकडे थकित ऊस बिले देण्याची मागणी केली. परंतु, कारखाना व्यवस्थापनाकडून या मागणीची पूर्तता न झाल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. साखरवाडी कारखाना अडचणीतून बाहेर यावा, ऊस उत्पादकांची थकित बिले देता यावीत यासाठी कारखाना प्रशासनाकडूनही विविध मार्गाने प्रयत्न सुरू होते. त्यांची अनेक कारखाने आणि उद्योजकाबरोबर चर्चाही सुरु होत्या. मात्र तोड़गा निघत नव्हता. वेळोवेळी तहसिलदार कार्यालयात बैठका झाल्या. मात्र, कारखाना प्रशासनाने वेळोवेळी तारखा दिल्या पण तोडगा निघाला नाही.

न्यु फलटण शुगर वर्क्‍स विकत घेण्यासाठी आता उद्योजक राजेंद्र काकडे पुढे आले आहेत. त्यांचा कारखान्याशी त्याप्रमाणे करारही झाला आहे. मात्र, न्यु फलटणने अद्याप पुढची प्रक्रिया पूर्ण न केल्याने शेतकऱ्यांना वाट पहावी लागेल, असे काकडे म्हणत होते. तथापी, ऊस बिल देण्यास अडचण येत होती. मात्र, शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेत यावर सुवर्णमध्य काढत 51 कोटी रुपयांची रक्कम येत्या दोन दिवसात शेतकऱ्यांना उपविभागीय अधिकारी संतोष जाधव यांच्या मार्फत देऊ, असे काकडे यांनी आश्वासन दिले आहे.

दरम्यान, न्यु फलटण शुगर वर्क्‍स आहे या स्थितीत विकत घेणार असल्याचे सांगत उद्योगपती राजेंद्र काकडे हे आज गुरुवारी रोजी तहसीलदार विजय पाटील यांच्या दालनात आले. मात्र, न्यु फलटण शुगर वर्क्‍सने अद्याप भागीदारीतील 78 टक्‍क्‍यापैकी ठरल्याप्रमाणे 68 टक्के समभाग वर्ग करण्यासाठी दिरंगाई होत असल्याचे सांगत काकडे यांनी ऊसाचे थकीत बिल देण्याची जबाबदारी झटकली. यामधून शेतकऱ्यांसाठी व कामगारांसाठी फक्त 10 टक्के समभाग वर्ग केल्यास व बॅंक ऑफ महाराष्ट्र येथील सह्यांचे अधिकार दिल्यास तातडीने 51 कोटी रुपये आम्ही देऊ व पुढील कार्यवाही होईपर्यंत उर्वरित रक्कम जमा करू, असे काकडे यांनी तहसीलदार पाटील यांना सांगितले होते. मात्र, त्यानंतर 10 कोटी रुपये देण्याचा निर्णय झाला.

त्यामुळे आता कारखान्याकडील शेतकऱ्यांचे असलेले देणे लवकर मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. तहसिल आवारात कोणताही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून पो. नि. प्रकाश सावंत यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष रजेंद्र ढवाण पाटील, धनंजय महामुलकर, नितीन यादव, डॉ. घाडगे, अनिल पिसाळ यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)