“न्यू आर्टस्‌’साठी अभिमतची चाचपणी करू- झावरे

शरद पवार यांच्या उपस्थितीत शताब्दी महोत्सव रंगणार

नगर: “जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेची शताब्दी महोत्सव 30 डिसेंबरला साजरा होत आहे. शैक्षणिक क्षेत्रात संस्थेच्या न्यू आर्टस्‌, कॉर्मस ऍण्ड सायन्स कॉलेजला राष्ट्रीय मूल्यांनक संस्थेच्या (नॅक) कमिटीकडून उच्च गुणांकन मिळाले आहेत. त्यावरून नॅक कमिटीने संस्थेला शैक्षणिक न्यू आर्टस्‌ कॉलेज अभिमत विद्यापीठाच्या दर्जाने चालवावे, अशी सूचना केली आहे. अभिमतचा दर्जा घेतल्यास सगळ्यात मोठी अडचण आर्थिक कोंडीची होते. केंद्र सरकार देखील कितपत मदत करेल, याचा भरवसा नाही. त्यामुळे अभिमतच्या दर्जाकडे घाईने न जाता हळूवारपद्धतीने चाचपणी करून जाऊ,’ अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या शताब्दी महोत्सव माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (ता. 30) सकाळी दहा वाजता होत आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री प्रा. राम शिंदे, विधानसभेचे उपाध्यक्ष विजयराव औटी, माजी सभापती दिलीपराव वळसे पाटील, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील प्रमुख उपस्थित राहतील, असेही झावरे पाटील यांनी सांगितले.

झावरे पाटील म्हणाले, “करवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराज मराठा बोर्डिंग या नावाने संस्थेचे रोपटे 1918 साली एका छोट्या वसतिगृहाच्या रुपाने लावले गेले होते. “तेजोसि तेजो मे देहि’, हे ब्रीद वाक्‍य स्वीकारून या संस्थेने 11 विद्यार्थ्यांच्या उपस्थित सुरू केलेले शैक्षणिक काम आज विद्यालये व महाविद्यालयांच्या 122 शाखांमधून 75 हजार पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहे. चार हजारांहून अधिक कर्मचारी वर्ग ज्ञानदानाचे काम करत आहेत.’ संस्थेच्या शाळा महाविद्यालयांत मुलींचे प्रमाण 50 टक्के पेक्षा अधिक आहे. संस्थेच्या महाविद्यालयांना राष्ट्रीय मूल्याकंन संस्थेकडून (नॅक) उच्च गुणांकन मिळाले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा उत्कृष्ट महाविद्यालय हा पुरस्कार देखील मिळाला आहे. संस्थेच्या न्यू आर्टस्‌ कॉलेजची शैक्षणिक वाटचाल पाहून “नॅक’ने अभिमत विद्यापीठाचा दर्जा घ्यावा, असे सूचविले आहे. हा संस्थेचा गौरवच आहे. केंद्र सरकारची आर्थिक धोरणे पाहता, संस्था याबाबत अजूनतरी विचारात नाही. अभिमत विद्यापीठाच्या धोरणाबाबत संस्था घाईघाईने कोणताही निर्णय घेणार नसल्याचेही झावरे पाटील यांनी स्पष्ट केले. शताब्दी महोत्सवानिमित्ताने संस्थेने उद्या (गुरूवारी) मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे. शुक्रवारी (ता. 28) व शनिवारी (ता. 29) महाराष्ट्राची लोकधारा हा संस्थेच्या विद्यार्थ्यांनी बसविलेला सांस्कृतिक कार्यक्रम होणार असल्याचेही झावरे पाटील यांनी सांगितले. उपाध्यक्ष रामचंद्र दरे, सचिव जी. डी. खानदेशे, सहसचिव ऍड. विश्‍वासराव आठरे पाटील, खजिनदार डॉ. विवेक भापकर, समन्वयक यू. आर. ठुबे, प्राचार्य डॉ. भास्करराव झावरे, प्राचार्य डॉ. राजकुमार देशपांडे आदी यावेळी उपस्थित होते.


रोजगारनिर्मितीच्या अभ्यासक्रमांवर भर

मराठा संस्थेच्या शैक्षणिक कामकाजाचा आवाका पाहून राष्ट्रीय मूल्यांकन संस्थेने (नॅक) उच्च दर्जा दिला आहे. अभिमत विद्यापीठ दर्जा घेण्याचे देखील सूचविले आहे. संस्थेने बदलता शिक्षणाचा कल लक्षात घेऊन, रोजगाराभिमुख कमी कालावधीतील उच्च दर्जाचे शैक्षणिक कोर्स सुरू करण्यावर पुढील काळात भर राहणार आहे. त्यानुसार अभ्यासक्रमांच्या निर्मितीवर देखील काम केले जात असल्याचे संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे पाटील यांनी सांगितले.


वर्षभर सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम

संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त वर्षभर सामाजिक आणि सांस्कृति कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. क्रीडा, सांस्कृतिक, पोस्टर स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, वक्तृत्व स्पर्धा, विज्ञान व रांगोळी स्पर्धा, पथनाट्य, विविथ व्याख्याने, रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, स्वागत गीत व स्फूर्ती गीत स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्याची माहिती यावेळी देण्यात आली.


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)