न्यूमोनिया: बालदम्यापासून बचाव (भाग 1)

न्यूमोनिया हा खालच्या म्हणजे अंतर्गत श्वसनसंस्थेचा – वायुकोषाचा दाह आहे. हा दाह जिवाणू, विषाणू, यामुळे होतो. याशिवाय विषारी हवा (उदा. रॉकेलच्या वाफा) उलटीतून आलेले द्रवपदार्थ श्वसनसंस्थेत घुसणे, इत्यादी कारणांपैकी कशानेही न्यूमोनिया होऊ शकतो.

डॉ. जयदीप महाजन

बाळाचा जन्म होताना काही बाळांच्या बाबतीत गर्भजल किंवा रक्त बाळाच्या श्वसनसंस्थेत ओढले जाऊ शकते. तिथे नंतर जंतुदोष होतो. एकूण न्यूमोनियाचे मुख्य कारण म्हणजे जंतुदोष होय. जंतुदोषामुळे वायुकोशाचा दाह होऊन त्यास सूज येते. यामुळे तिथले कामकाज बंद पडते. न्यूमोनिया बहुधा एका बाजूच्या फुप्फुसाच्या काही भागातच होतो. (पण तो दोन्ही बाजूंनाही होऊ शकतो) दाह व सूज यांमुळे या भागात वेदना असते. पण लहान मुले ही वेदना सांगू शकत नाहीत. श्वसनसंस्थेचा काही भाग तात्पुरता निकामी झाल्यामुळे इतर भागावर श्वसनाची जास्त जबाबदारी येते. त्यामुळे दम लागतो.

न्यूमोनिया: बालदम्यापासून बचाव (भाग 2)

बाल न्यूमोनिया
या आजाराने खूप बाळे दगावतात. बालन्यूमोनिया हा फुप्फुसाच्या एका भागात जंतुदोष झाल्याने होणारा आजार आहे. यात खोकला, ताप, दम लागणे ही मुख्य लक्षणे असतात. लोकभाषेत याला डबा, पोटात येणे अशीही नावे आहेत. बालन्यूमोनियाचे मृत्यू जंतुविरोधी औषध दिल्याने टळतात.
हा आजार सहसा पाच वर्षाखालील मुलांमध्ये होतो पण त्यातही विशेष करून पहिल्या दोन वर्षात याचे प्रमाण जास्त असते. मूल कुपोषित असेल तर हा आजार होण्याचा धोका आणि मृत्यूची शक्‍यताही जास्त असते. गोवराच्या तापानंतर हा आजार होण्याची शक्‍यताही असते. अपु-या दिवसांच्या किंवा अशक्त मुलांना हा आजार होण्याची जास्त शक्‍यता असते. हा आजार साथीचा नसतो. पण थंडी-पावसात या आजाराचे प्रमाण जास्त असते.

रोगनिदान
या आजाराची मुख्य लक्षणे म्हणजे खोकला, ताप व दम लागणे. नुसता ताप, खोकला (पण दम नाही) असेल तर त्याला बालन्यूमोनिया न म्हणता ताप-खोकला म्हणतात. असे साधे आजार शक्‍यतो बाह्य श्वसनसंस्थेत (नाक, घसा,) किंवा श्वासनलिकेत जंतुदोष झाल्यामुळे होतात. ताप, खोकला, दम लागणे या तीन लक्षण-चिन्हांवरून बालन्यूमोनियाचे निदान होऊ शकते. बालन्यूमोनिया सौम्य आहे की गंभीर हे आपण ओळखायला शिकू शकतो. सौम्य आजार असेल तर गावात तुम्ही उपचार करू शकाल. तीव्र आजार असेल तर रुग्णालयात पाठवायला पाहिजे. योग्य उपचाराने मूल वाचू शकते.

दम लागण्याची तपासणी
बाळ दर मिनिटास किती वेळा श्वास घेते, हे मोजून दम लागला आहे की नाही ते ठरते. दोन महिन्यांपेक्षा लहान बाळ असेल तर श्वसनगती मिनिटास 60 पेक्षा जास्त असल्यास दोष समजावा.1 वर्षापर्यंतचे बाळ असेल तर मिनिटास 50 पेक्षा जास्त श्वसनगती असल्यास दोष समजावा. 6 महिने ते 1 वर्षापेक्षा मोठया मुलांमध्ये मिनिटाला 40 पेक्षा अधिक श्वसन गती असेल तर दोष समजावा. हे तुम्हाला घडयाळाच्या सेकंद काटयाबरोबर छातीची हालचाल मोजून कळू शकते. यासाठी पूर्ण मिनिटभर श्वसन मोजा. श्वसनाची गती बरीच अनियमित असल्याने पूर्ण मिनिट मोजावेच लागते.
या बरोबरच नाकपुडया फुललेल्या दिसतात, त्वचा, जीभ, ओठ यांवर थोडी निळसर झाक असते. अशा बाळाच्या रक्तात प्राणवायू कमी, कार्बनवायू जास्त म्हणून असे होते.

बालन्यूमोनिया सौम्य आहे की गंभीर ?
ताप, खोकला, दम लागणे या झाल्या न्यूमोनियाबद्दल प्राथमिक गोष्टी. याव्यतिरिक्त खालीलपैकी एखादीही खूण असेल तर आजार जास्त आहे हे निश्‍चित. श्वास आत घेताना खालची बरगडी आत ओढली जाणे. यासाठी बाळाचा कपडा वर करून पोट-छाती पाहा.
पश्वास आत घेताना बाळ कण्हत असल्यास.
पश्वास बाहेर सोडताना शिटीसारखा आवाज येणे.
पझटके (बाळाचे सौम्य झटके ओळखायला आपल्याला शिकायला पाहिजे).
पबाळाने अंगावरचे दूध न ओढणे.
पपोट डंबरलेले असणे/ फुगून येणे.
पबाळ सतत झोपणे, लवकर जागे न होणे, जागे झाले तर लगेच झोपणे.
पमूल आधीच कुपोषित असेल तर धोका जास्त असतो.
शरीराचे तपमान नेहमीपेक्षा कमी होणे. (बाळाचे अंग गार पडणे) हा बाळ गार पडण्याचा प्रकार दोन महिन्यांपेक्षा लहान मुलात होऊ शकतो, हा तापाच्या उलट आणि धोकादायक प्रकार आहे हे लक्षात घ्या.

उपचार
पेनिसिलीन गटातले औषध किंवा ऍमॉक्‍सी ताबडतोब सुरू करावे व रुग्णालयात पाठवून द्यावे. उपचार लवकर सुरू झाल्यास हमखास गुण येतो. पण उशीर झाला असल्यास उपचार सुरू करून डॉक्‍टरकडे पाठवणे चांगले. यात बाळ दगावू शकते म्हणून सर्व प्रयत्न वेळीच करायला पाहिजे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)