न्यु फलटण शुगर्सवर साखर आयुक्तांची कारवाई

संग्रहित छायाचित्र

मालमत्ता विकून शेतकऱ्यांचे पैसे देण्याचे आदेश

फलटण – साखरवाडी ता.फलटण येथील न्यु फलटण शुगर्स कारखान्याने शेतकऱ्यांचे 48 कोटी रूपयांची देणी थकविल्याप्रकरणी साखर आयुक्तांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.कारखान्याकडील साखर, मोलॅसिस व बगॅस इ.उत्त्पादनांची विक्री करून रक्कम वसूल करण्यात यावी.तसेच आवश्‍यकतेप्रमाणे कारखान्याच्या जंगम व स्थावर मालमत्तेची विक्री करून शेतकऱ्यांना पैसे देण्यात यावेत, असे आदेश साखर आयुक्त संभाजी कडू पाटील यांनी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांना दिले आहेत.

एफआरपी कायद्यानुसार शेतकऱ्यांनी कारखान्यांना ऊस घातल्यानंतर 14 दिवसांच्या आत रक्कम अदा करणे बंधनकारक आहे. मात्र, दि.15 एप्रिल 2018 अखेरच्या ऊसदर देयबाकी अहवालानुसार न्यु फलटण शुगर्स कारखान्याने 2 लाख 83 हजार 457 मेट्रीक टन उसाचे 47 कोटी 86 लाख 98 हजार रूपये देणे बाकी ठेवले आहे. याबाबत साखर आयुक्त कार्यालयाने तीन वेळा घेण्यात आलेल्या सुनावणींसाठी कारखाना प्रतिनिधींना हजर राहण्याबाबत कळविले होते. त्यापैकी शेवटच्या 12 एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या सुनावणीसाठी कारखान्याच्यावतीने सीईओ विवेक संत हे हजर राहिले. यावेळी संत यांनी थकबाकी अदा करण्याचे लेखी कबूल केले होते. मात्र, अद्यापपर्यंत पुरेशी संधी देवून देखील शेतकऱ्यांची देणी अदा न झाल्याने अखेर साखर आयुक्तांनी सर्व रक्कम वसूल करून शेतकऱ्यांना देण्यासाठी साखरेसह मालमत्तेची विक्री करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ऊस पुरवठाधारक शेतकऱ्यांची यादी व कारखान्याच्या मालमत्तेचे विवरणपत्र जिल्हाधिकारी कार्यालयात त्वरित उपलब्ध करून द्यावेत, असे ही आदेशात शेवटी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
51 :thumbsup:
13 :heart:
31 :joy:
77 :heart_eyes:
14 :blush:
97 :cry:
109 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)