न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांचे निधन

नागपूर – मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश आणि ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत चंद्रशेखर धर्माधिकारी यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले आहे. वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी नागपूरच्या एका खासगी रुग्णालयात पहाटे अखेरचा श्‍वास घेतला. त्यांच्या रूपाने सर्वसामान्यांच्या कल्याणाची आस बाळगणारा व एक सच्चा व समन्वयी कार्यकर्ता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

चंद्रशेखर धर्माधिकारी यांचा जन्म 20 नोव्हेंबर 1927 रोजी मध्य प्रदेशमधील रायपूर येथे झाला. स्वातंत्र्य लढ्यातही त्यांनी सहभाग घेतला होता. न्यायदानात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. अनेक महत्त्वाच्या खटल्यांमधील त्यांचे निर्णय दिशादर्शक ठरले. नागपूरच्या चिटणीस पार्कजवळील प्राथमिक महापालिका शाळेत त्यांचे सुरुवातीचे शिक्षण झाले. त्याच्यावर गांधी विचारांचा खूप मोठा पगडा होता. न्यायाधीशासोबतच ते उत्तम लेखक होते. 1942च्या “भारत छोडो’ आंदोलनातही त्यांनी भाग घेतला होता. त्यांना सुमारे तीन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी हिंदी, मराठी आणि गुजराती भाषेत पुस्तके लिहिली. उत्कृष्ट कार्यासाठी धर्माधिकारी यांना 2003 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. तसेच काही दिवसांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला होता. त्यामुळे त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत होते. परंतु, उपचारानंतरही त्यांच्या प्रकृतीत फारशी सुधारणा झाली नाही. अखेर आज पहाटे दीडच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

मुंबई उच्च न्यायालयात एक आदरणीय न्यायाधीश म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवला. आपल्या न्यायालयीन कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय दिले. न्या.धर्माधिकारी एक प्रभावी वक्ते होते. ते ग्रामविकास, श्रमिक प्रतिष्ठा व खादीचे खंदे पुरस्कर्ते होते. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या गांधी जयंतीच्या दिवशी ते राजभवन येथे महात्मा गांधींच्या तत्वज्ञानावर बोलले होते. त्यांच्या चिरंतन स्मृतींना मी अभिवादन करतो तसेच त्यांच्या कुटुंबियांना आपल्या शोकसंवेदना कळवतो, असे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दुःख व्यक्‍त केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)