न्यायालयात “दूध का दूध, पानी का पानी’ होईल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : न्या. लोयांच्या मृत्यूचे काही लोक राजकारण करताहेत
मुंबई – न्या. लोया यांचा मृत्यू झाल्यानंतर तीन वर्षे कोणीही संशय व्यक्‍त केला नव्हता. एका नियतकालिकात लेख छापून आल्यानंतरच याची चर्चा सुरू झाली. मात्र, त्यांच्या कुटुंबियांच्या मनातही कोणता संशय नसून काही लोक त्यांच्या मृत्यूचे राजकारण करीत असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केला. हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात असून निकालात “दूध का दूध आणि पानी का पानी’ होईलच, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

विधानसभेत कायदा व सुव्यवस्थेवरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. न्या.लोयाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दोन्ही बाजूचा युक्‍तीवाद संपला आहे. लवकरच याप्रकरणाचा निकाल अपेक्षित असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महणाले, एका लग्नाला उपस्थित राहण्यासाठी न्या.लोया नागपूरला गेले होते. ते रविभवन येथे राहिले. लग्नाला उपस्थित राहून रात्री 11 वाजता ते रविभवनला आले. रात्री अकरा ते साडेअकरा ते दूरध्वनीवरून पत्नीशी बोलले.

त्यानंतर सहकाऱ्यांसोबत गप्पा मारून झोपायला गेले. पहाटे चार वाजता त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांचे सहकारी त्यांना घेऊन दंदे रूग्णालयात गेले. दंदे रूग्णालयही मोठे आहे. तेथून त्यांना मेडिट्रिनाला नेण्यात आले. तिथे पोहोचेपर्यंत त्यांच्या हृदयाचे ठोके कमी झाले होते. त्यांना सीपीआरही देण्यात आला.सकाळी सव्वा सहा वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसह प्रमुख चार न्यायाधीश हे सात वाजता रूग्णालयात हजर होते, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

न्या. लोया यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर तीन वर्षे कोणीही काहीही बोलले नाही. एका नियतकालिकात लेख छापून आल्यानंतर उलट-सुलट चर्चा सुरू झाली. मुळात हा लेखच पूर्णपणे खोटा आणि असत्य माहितीवर आधारित आहे. न्या. लोया यांच्या मुलानेही पत्रकार परिषद घेऊन कुटुंबियांच्या मनात कोणताही संशय नसल्याचे स्पष्ट केले आहे. लेखात ज्या डॉ. शर्मांचा संदर्भ देण्यात आला आहे त्यांनी देखील पत्र लिहून त्यांच्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ छापून आल्याचे स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयात आता या प्रकरणाचा निकाल लागेलच. त्यातूनच “दूध का दूध आणि पानी का पानी’ होईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)