न्यायालयाच्या इमारतीस पाणीपुरवठ्यास विरोध

संगमनेर, दि. 21 (प्रतिनिधी) – तालुक्‍यातील गुंजाळवाडी येथील न्यायालयाच्या नवीन इमारतीला पाणीपुरवठा करण्यास नगरसेवकांनी विरोध केला आहे. शुक्रवारी प्रांताधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात आले.
शासनाने संगमनेर नगरपालिकेला गुंजाळवाडी येथील नवीन न्यायालयीन इमारत आणि वसाहतीस पाणी पुरवठा करण्याबाबत कळवले आहे. पालिकेच्या सभेत या निर्णयास सर्व नगरसेवकांनी विरोध दर्शवला. नगराध्यक्षा दुर्गातांबे यांच्यासह सर्व नगरसेवकांनी आज प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले.
उपनगराध्यक्ष नितीन अभंग, नगरसेवक दिलीप पुंड, बाळासाहेब पवार, विश्‍वास मुर्तडक, सोनाली शिंदे, रुपाली औटी, कुंदन लहामगे, सुनंदा दिघे, शमा शेख, इब्राहीम देशमुख, शबाना बेपारी, नूरमोहंमद शेख, किशोर पवार, सुहासिनी गुंजाळ, गजेंद्र अभंग, मनीषा भळगट, मालती डाके, किशोर टोकसे, शैलेश कलंत्री, वृषाली भडांगे, शाहनवाज खान, हिरालाल पगडाल, रिजवान शेख यावेळी उपस्थित होते.
प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहेकी, शहराची पाणी पुरवठा योजना निळवंडे धरण उद्‌भव धरुन मंजूर झाली आहे. उर्वरीत पाणी प्रवरा नदी पात्रातील विहिरींद्वारे उचलण्यात येऊन शहरास पाणी पुरवठा करण्यात येतो. शहराची सध्याची पाण्याची गरज लक्षात घेता नगरपालिका गुंजाळवाडी येथील नवीन न्यायालयीन इमारतीस पाणीपुरवठा करण्यास सक्षम नाही. वाढती लोकसंख्या, वाढणाऱ्या नागरी वसाहतींमुळे पूर्ण दाबाने पाणी पुरवठा करण्यास अडथळा येत आहे.
न्यायालयीन इमारतीस पाणी दिल्यास लगतच्या वसाहती, गावे आणि संस्थांनाही पाणी द्यावे लागेल. यामुळे शहराची पाणी पुरवठा व्यवस्था कोलमडून पडेल. नगरपालिकेच्या हद्दीपासून न्यायालयीन इमारतीचे अंतर अडीच कि. मी .असल्याने पाणी चोरी होण्याचीही दाट शक्‍यता आहे. शासनाने नगरपालिकेला एकतर्फी निर्देश देण्यापूर्वी आपले म्हणणे सादर करण्याची संधी देणेआवश्‍यक आहे. परंतु नवीन न्यायालय इमारतीस पाणी पुरवठा करण्याचेपालिकेला दिलेले निर्देश अयोग्य आहे.
शासनाने 5 मार्च 2017 रोजी दिलेला आदेश त्वरीत रद्द करावा. तसे न झाल्यास शहरवासियांच्या भावना लक्षात घेवून आगामी काळात जनआंदोलन, मोर्चे, धरणे उपोषण, बंद करण्यात येईल, याची सर्व जबाबदारी शासनाची राहिल, असे निवेदनात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)