न्यायालयाचा जमाल गोटा?

 चर्चा

एकनाथ बागूल

उन्नाव नामक विधानसभा मतदारसंघातील राजकीयदृष्ट्या शक्तीमान समजल्या जाणाऱ्या आरोपी आमदाराला स्थानिक पोलीस, एस. आय. टी. आणि सी.बी.आय. पोलिसांच्या चक्रव्यूहातून अलगद सुटलेल्यानंतर सुद्धा शेवटी अलाहाबाद उच्च न्यायालयानेच दिलेल्या कठोर इशाऱ्यामुळे पोलीस कोठडीची हवा खाण्याची पाळी आली हे वास्तव जास्तच उल्लेखनीय वाटते.

उत्तर प्रदेशामधील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे एक प्रभावशाली आमदार कुलदीपसिंग सेनगर यांना अल्पवयीन बालिकेवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून अखेर शुक्रवारी पहाटे 4 वाजता केंद्रीय पोलिसांच्या सी.बी.आय. नामक पथकाने त्यांच्या निवासस्थानी अटक केली. संबंधित दुर्दैवी बालिका आमदार सेनगर यांना “काका’ म्हणत असे. परंतु या काकांनीच तिच्याशी पाशवी वर्तन केल्यानंतर स्वतः तिने आणि तिच्या वडिलांनी उन्नाव पोलिसांकडे रितसर तक्रार नोंदविली. परंतु पोलिसांनी त्या अत्यंत गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेण्याऐवजी त्या बालिकेच्या पित्यालाच अटक केली.

शिवाय जास्तच धक्कादायक प्रकार म्हणजे पोलीस कोठडीत पोलिसांनी केलेल्या भीषण मारहाणीमध्ये त्या अभागी पित्याचा बळी गेला. राज्यातील उन्नाव विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडून आलेल्या कुलदीपसिंग सेनगर नावाच्या आरोपीने केलेल्या या बलात्कार प्रकरणी पोलीस यंत्रणेप्रमाणेच राज्य सरकारच्या पातळीवरही तातडीने दखल घ्यावयास हवी होती. उलट पोलिसांसह संपूर्ण शासकीय यंत्रणाच आरोपी भाजप आमदाराची पाठराखण करण्यातच पुढाकार घेत असल्याचे सतत आढळत होते. राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे ज्यांच्या हातामध्ये भाजपने सोपविली आहेत. त्या योगी आदित्यनाथ या सन्यासी मुख्यमंत्र्यांनी बालिकेची कुटुंबीय मंडळी, विरोधी राजकीय पक्ष, महिला संघटना तसेच केंद्र सरकारचा दबाव आदी घडामोडींमुळे त्या गुन्हेगाराविरुद्ध पोलिसांच्या दफ्तरी तक्रार नोंदवून घेण्याचे पाऊल उचलले.

मात्र, आरोपी आमदार आणि त्याच्या आश्रित गुंडांच्या टोळीच्या आणि समाजकंटकांच्या धमक्‍या व उपद्रवी कृत्यांचा लौकिक विचारात घेऊन पोलिसांचे हात अटकेसारखी कारवाई करण्यास शेवटपर्यंत थरथरतच असल्याचे आढळले. सरकारी पातळीवर होत असलेल्या चिंताजनक दिरंगाईचे जाहीर समर्थन करण्यात तीन प्रमुख केंद्रीय मंत्रीही सहभागी असल्याचे त्यांच्या नावासह प्रसिद्ध झाले आहे. सरतेशेवटी नाईलाजाने एस.आय.टी. मार्फत चौकशी करण्याची तयारी दर्शविणाऱ्या योगी आदित्यनाथ सरकारला थेट अलाहाबाद उच्च न्यायालयानेच आरोपी आमदाराला अद्याप अटक करण्यास का टाळाटाळ करीत आहेत. असा खडा सवाल विचारला. त्यामुळेच भाजपचा तो “पराक्रमी’ आमदार पोलीस कोठडीत दाखल झाला.

आरोपी आमदाराची स्थानिक उन्नाव मतदारसंघातील प्रचंड दहशत, पोलिसांनी त्यामुळेच स्वीकारलेली हतबलता, सत्तेच्या सिंहासनावर बसलेल्या संन्यासी मुख्यमंत्र्यांनी राजकीय हितसंबंध जपण्यासाठी नैतिक व घटनात्मक कर्तव्याकडे सोयीस्करपणे प्रारंभी दाखविलेली असंवेदनशीलता आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या कानपिचक्‍या व राजधानी दिल्लीमधील इंडिया गेटजवळ उन्नाव आणि कथुआ येथील बलात्काराच्या घटनेच्या संदर्भात केंद्र सरकारकडून प्रकट होणाऱ्या असंवेदनशील वर्तनाच्या निषेधार्थ रात्रीच्यावेळी हातात मेणबत्ती घेऊन महिलांचा मोर्चा आयोजीत करण्याचा जो कार्यक्रम कॉंग्रेस आणि महिला संघटनांनी हाती घेतला त्याची केंद्र व राज्य सरकारला योग्य दखल घ्यावीच लागली.

उन्नावच्या आमदाराने केलेल्या बलात्काराची पोलिसांनी तक्रार नोंदवून न घेणे, त्यानंतर तक्रार नोंदवूनही आरोपीला अटक न करणे, राज्य सरकारने एस. आय. टी. तर्फे त्या गुन्ह्याचा तपास करणे, त्या तपासाच्या अहवालामध्ये भाजप आमदारावरील आरोपाची सत्यता लेखी स्वरुपात नोंदविली जाणे आणि तरीही योगी आदित्यनाथ सरकारने आरोपी आमदाराला मोकाट सोडण्याचे वर्तन चालू ठेवले होते हे सर्व तपशील सत्तेच्या राजकारणामध्ये बेभानपणे स्वैरपणे संचार करीत असलेल्या आधुनिक भारतीय राजकारणामध्ये आता नवीन किंवा आश्‍चर्यकारक राहिलेले नाही. अगदी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये दोन राजकीय नेत्यांच्या निवडणुकीच्या वादातून झालेल्या भीषण हत्येच्या गुन्ह्यातील आरोपींच्या अटकेबाबत पोलीस आणि विशेषतः राज्य सरकारने प्रारंत्री जी दिरंगाई केली ती उन्नाव प्रकरणातील भाजपच्या आमदाराच्या ताज्या अटकप्रकरणी सत्ताधारी राजकीय नेत्यांनी केलेल्या वर्तनाचीच आठवण करून देणारी आहे.

अशा रानटी घटना एकट्या महाराष्ट्रात किंवा उत्तर प्रदेशापुरताच मर्यादित राहिल्या नसून देशाच्या विविध भागातील बलात्कार, खून किंवा आर्थिक घोटाळ्यासारख्या वाढत्या घटनांशी संबंधीत राजकीय वजनदार नेत्यांच्या निकटवर्ती लाभार्थ्यांचा जर प्रत्यक्ष संबंध आढळला तर हमखास निदर्शनास येतात. उन्नावमधील बलात्कारी आमदाराच्या अटकेसाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या दणक्‍यानंतर नाईलाजाने केलेल्या हालचाली म्हणूनच प्रातिनिधीकच समजाव्या लागतील. एखादा गुन्हेगाराजवळ निवडणूक जिंकण्याचे “कौशल्य’ असेल, तर हमखास तो “धूतपापेश्‍वर’ अथवा “पतितपावन’च मानला जातो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)