‘नो हेल्मेट’ कारवाई करणारच!

वाहतूक पोलिसांचे स्पष्टीकरण : नियम पाळण्याचे आवाहन

पुणे – ‘न्यायालयाच्या आदेशानुसार दुचाकीचालकाने हेल्मेट वापरणे गरजेचे आहे. यासंदर्भात जानेवारी 2005 मध्ये राज्यशासनाने सुधारित परिपत्रक काढून सार्वजनिक मार्गांवर दुचाकीस्वारांना हेल्मेट बंधनकारक केले आहे,’ असे सांगत “हेल्मेट न वापरणाऱ्यांवर यापुढे कारवाई सुरू राहणार आहे,’ अशी ठाम भूमिका वाहतूक पोलिसांनी घेतली आहे. यामुळे कारवाईबाबतच्या तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दि. 1 जानेवारीपासून शहरात “नो हेल्मेट’ कारवाई वाढवण्यात आली आहे. दररोज सुमारे 5 हजारांपेक्षा जास्त जणांवर कारवाई केली जात आहे. यात मॅन्युअली आणि सीसीटीव्ही कारवाईचाही समावेश आहे. यामुळे काही नागरिक याला विरोध करत असून गुरूवारी हेल्मेट सक्‍तीविरोधी कृती समितीने निषेध रॅली काढली. त्यांनी पोलीस आयुक्‍त के. वेंकटेशम यांना निवेदन देऊन शहरातील रस्ते, अशास्त्रीय स्पीडब्रेकर आदींकडे लक्ष वेधत हेल्मेट कारवाई थांबवण्याची मागणी केली. मात्र, “नियमानुसार कारवाई करण्यात येत असून ती सुरू राहील,’ असे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले आहे.

मोटार वाहने अधिनियम 1988 च्या कलम 129 नुसार राज्य शासनाच्या सुचनेनूसार ही कारवाई करण्यात येत असल्याचे वाहतूक उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी सांगितले. तसेच, महामार्गावर दुचाकी चालविताना हेल्मेट सक्‍तीचे असून महापालिका हद्दीत हेल्मेटची सक्ती नसल्याचा दावा काही जण करत आहेत. या पार्श्‍वभूमीवर 12 जानेवारी 2017 रोजी राज्य शासनाने परिपत्रक काढले असून “राज्यातील संपूर्ण क्षेत्रात मोटार सायकल चालविणाऱ्या किंवा तिच्यावरुन प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्‍तीने सार्वजनिक ठिकाणी असताना शिरोवेष्टन वापरणे बंधनकारक आहे,’ असे यात म्हटले.

रस्त्याची दुरवस्था, अशास्त्रीय गतिरोधक, मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या चालकांवरती प्रशासनाने लक्ष देण्याचे सोडून सभ्यपणे गाडी चालवणाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे. यामुळे हेल्मेट कारवाईशिवाय इतर बाबींकडे प्रशासनाने लक्ष द्यावे.
– विवेक वेलणकर, माहिती अधिकार कार्यकर्ते


रस्ते अपघातांच्या घटना चिंताजनक आहेत. या पार्श्‍वभूमीवर न्यायालयानेदेखील चिंता व्यक्‍त करत उपाययोजना सूचविल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून हेल्मेट वापरणे बंधनकारक असून याची अंमलबजावणी सुरू आहे.
– तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त, वाहतूक


लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेटचा वापर आवश्‍यक असून नागरिकांनी या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे. नागरिकांची सुरक्षा लक्षात घेत पोलिसांनी देखील हेल्मेटसक्ती गांभीर्याने घेत त्याबाबत कारवाई करावी. उच्च न्यायालयाने आपल्या निकालात हेल्मेट वापराची बाब अधोरेखित केली असून त्याकडे पोलिसांनी लक्ष द्यावे.
– सुजीत पटवर्धन, अभ्यासक, रस्ता सुरक्षा.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)