‘नो पार्किंग’च्या फलकांसमोरच नियम पायदळी

कोंढवा खुर्द व कोंढवा बुद्रुक परिसरातील नागरिक बेजार


वाहतूक पोलीस बिदागीत मश्‍गूल

कोंढवा- कोंढवा खुर्द व कोंढवा बुद्रुक परिसरातील मोठ्या वर्दळीच्या मुख्य रस्त्यांवर “नो पार्किंग’च्या फलकांसमोरच शेकडो दुचाकी व इतर वाहने भररस्त्यात पार्किंग केली जात असल्याने रस्ता अरुंद होत आहे. या समस्यांवर तोडगा काढण्याची तसदी अधिकाऱ्यांकडून घेतली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

जीवघेणी वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक कोंडीमुळे दररोज छोटे – मोठे अपघात घडत असूनही कोंढवा वाहतूक विभागाचे पोलिसही या वाहनांवर कारवाई करण्यास फारसे धजावत नाहीत. त्यामुळे हा मार्ग मोकळा श्‍वास कधी घेणार की नाही, असा सवाल वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी केला आहे.

कोंढवा परिसरातील मुख्य रस्त्यावर जागोजागी “नो पार्किंगचे फलक लावले आहेत. मात्र, या फलकांचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. कारण “नो पार्किंग’मध्ये गाड्या लावणाऱ्या वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून कोणतीच कारवाई होताना दिसत नाही. कारवाई केवळ रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांना अडवून केली जाते. त्यामुळे “नो पार्किंग’मध्ये पार्किंग करून हे बेशिस्त वाहनचालक बिनधास्त असतात.

पोलिसांचा कोणताच धाक अथवा दंडाची भीती त्यांना नसते.त्यामुळे या मार्गावरील, हॉटेल्स, मॉल, हॉस्पिटल्स, बॅंका, इतर व्यावसायिकांना कोणतीही स्वतंत्र पार्किंग केलेली नसल्याने याठिकाणी येणारे ग्राहक भररस्त्यातच वाहने पार्किंग करत असल्याने रस्ता अरुंद होऊन पादचारी व ज्येष्ठ नागरिकांना तर रस्त्यावरुन चालणेही धोक्‍याचे झाले आहे. या मार्गावरील बसथांब्यांवर काही व्यावसायिकांनी अतिक्रमण करून स्वतःची दुकाने थाटलेली आहेत.त्यामुळे प्रवाशी रस्त्यावर भरउन्हात उभे राहतात. तरी पालिका प्रशासन व वाहतूक पोलीस कोणतीच कारवाई का करत नाहीत, असा सवाल नागरिकांनी केला आहे.

वाहतूक पोलीस नो पार्किंगमधील वाहनांवर कारवाई करण्याऐवजी खडी मशिन चौकाजवळ व एनआयबीएम मार्गावरील अवजड व छोटे, मोठे टेम्पो, दुचाकी अडवून वसुली करण्यातच धन्यता मानत असल्याचे विदारक चित्र दिसत आहे. त्यामुळे कोंढव्यातील वाहतूक समस्या जीवघेणी होऊन सतत छोटे, मोठे अपघात होऊन हे रस्ते वाहतुकीसाठी धोकादायक झाले आहेत. तरी वाहतूक पोलीस विभाग व पालिका प्रशासनाने रस्त्यात अतिक्रमण करणारे व “नो पार्किंग’मध्ये पार्किंग करणाऱ्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी वाहनचालक व नागरिकांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)